
सर्व समाजघटकांसाठी सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असते. युवकांनी स्वप्नांच्या मागे धावताना योजनांचा आधार घेत स्वप्नपूर्ती केली पाहिजे. तरुणांच्या स्वप्नपूर्तीने समाजासह देश पुढे जाईल. दिव्यांगांचा हा आगळावेगळा सर्वधर्मीय विवाहसोहळा निश्चितच प्रेरणादायी असून मानवतेची सेवा करणे हाच आपला खरा धर्म आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय दिव्यांगांचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळा नूतन विद्यामंदिर मैदान परिसरात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, समाजकारण हे महत्त्वाचे आहे. सर्वधर्मीय 31 जोडप्यांच्या विवाहाचे नियोजन करणे हे काही सोपे काम नसून त्यांना एकत्र आणून पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी घेणारे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या कार्याचे काwतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिव उद्योग सहकार सेनेचे जिल्हाप्रमुख अभय कुलकर्णी यांनी केले. दिव्यांग विवाह सोहळ्याला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी सामाजिक न्याय आणि परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, खासदार हेमंत पाटील, आमदार डॉ. राहुल पाटील, अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्यासह सर्वधर्मीय धर्मगुरूंची प्रमुख उपस्थिती होती.
‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
परभणीतील या राज्यस्तरीय सर्वधर्मीय दिव्यांग विवाहसोहळ्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे डॉ. मनोज तत्त्ववादी, धनंजय मिश्रा यांनी घेतलेल्या नोंदीचे प्रमाणपत्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आमदार डॉ. राहुल पाटील यांना देण्यात आले. राज्यस्तरीय सर्वधर्मीय 31 जोडपी विवाहबद्ध झाली.

























































