
पुणे जिह्यात आज एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 9 जणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. पहिल्या घटनेत खेड तालुक्यातील चासकमान धरणात उतरलेल्या कृष्णामूर्ती फाऊंडेशनच्या गुंडाळवाडी येथील तिवई हिलवर असलेल्या सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये परराज्यातील दोन मुली व दोन मुलांचा समावेश आहे. चौघांचेही मृतदेह धरणातून बाहेर काढले आहेत. ही घटना सायंकाळी साडेपाच वाजता उघडकीस आली.
तर, दुसरी घटना भोर तालुक्यातील नरेगाव हद्दीतील भाटघर धरणावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत फिरण्यासाठी आलेल्या पाच विवाहित महिला पोहताना पाण्यात बुडाल्या. बुडालेल्या महिलांपैकी चौघींचे मृतदेह सापडले असून, एकीचा शोध सुरू होता. या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
परिक्षित अग्रवाल, रितीन डीडी, तनिषा देसाई व नव्या भोसले (संपूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) अशी चासकमान धरणात बुडालेल्या चार मुलांची नावे आहेत. हे चौघेही परराज्यातील असून ते दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते.

























































