रत्नागिरीत वळीवाच्या पावसाची रिपरिप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात वळीवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. वळीवाच्या पावसामुळे अंतिम टप्प्यातला आंबा अडचणीत सापडला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 72.37 मिमी एकूण सरासरी 11.79 मिमी पाऊस पडला. सर्वच तालुक्यात वळीवाच्या पावसाची रिपरीप झाली.

शनिवारी सायंकाळपासून वळीवाचा पाऊस सुरू झाला. पहाटेपर्यंत या पावसाची रिपरिप सुरु होती. आज दिवसभर जिल्ह्यात मळभ होते. तसेच पावसाचे शिंतोडे सुरुच होते. गेल्या 24 तासात मंडणगड 1.9 मिमी. दापोली तालुक्यात 4.50 मिमी, खेड तालुक्यात 14 मिमी, गुहागर तालुक्यात 12.10 मिमी. चिपळूण तालुक्यात 25.5 मिमी, संगमेश्वर तालुक्यात 15.50 मिमी, रत्नागिरीत 13.50 मिमी. लाजात 9.70 मिमी आणि राजापूरात 9 मिमी पाऊस पडला. पावसामुळे रत्नागिरीतील रस्ते ओलेचिंब झाले. अनेकांनी रिपरिप पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

आंबा काढणी सध्या शेवटच्या टप्प्यात सुरु आहे. या शेवटच्या टप्प्यातील आंब्याला वळीवाच्या पावसाचा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात आल्यामुळे यापूर्वीच आंब्याचे दर उतरले आहेत. आता वळीवाच्या पावसामुळे हापूस आंबा संकटात सापडला आहे.