महावितरणची एप्रिलमध्ये 261 कोटी रुपयांची बचत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजेची मागणी वाढताच केंद्रीय पॉवर एक्स्चेंजमधून अव्वाच्या सव्वा दराने वीज विकली जायची. त्याला केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून चाप लावत प्रतियुनिटचा कमाल दर 12 रुपये एवढा निश्चित केला आहे. त्यामुळे देशातील सर्वच वीज वितरण कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला असून एप्रिल महिन्यात विजेची आणीबाणी असतानाही सरासरी 8.66 रुपये प्रतियुनिट दराने महावितरणला वीज मिळाल्याने तब्बल 261 कोटी रुपयांची बचत झाली आहे. याचा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांना भविष्यातील वीज दर निश्चितीवेळी होणार आहे.

तापमानचा पारा चढल्याने महावितरणकडे दररोज कमाल 24-25 हजार मेगावॅट विजेची मागणी नोंदली जात आहे. त्यातच देशात कोळसाटंचाईमुळे मार्चपासून औष्णिक वीज केंद्रातील वीजनिर्मितीवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे विजेची दैनंदिन मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्रीय एक्स्चेंजमधून वीज घेण्याशिवाय पर्याय नव्हता. एरव्ही दोन-अडीच रुपये प्रतियुनिट दराने मिळणाऱया विजेला मागणी वाढल्याने मार्चमध्ये 17-18 रुपये मोजावे लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पॉवर एक्स्चेंजमधील प्रतियुनिट विजेचा कमाल दर 12 रुपये एवढा निश्चित केला आहे. त्यामुळे महावितरणला एप्रिल महिन्यात सरासरी 8 रुपये 64 पैसे प्रतियुनिट दराने तब्बल 415 दशलक्ष युनिट वीज उपलब्ध झाली आहे. एप्रिल महिन्यात देशातील सर्वच वीज वितरण कंपन्यांकडून पॉवर एक्स्चेंजमध्ये मोठय़ा प्रमाणात विजेची मागणी नोंदली जात होती. त्यामुळे विजेच्या दरावर प्रतियुनिटला 12 रुपयांची मर्यादा नसती तर महावितरणला सरासरी 15 रुपये युनिट एवढय़ा चढय़ा दराने वीज खरेदी करण्याची नामुष्की ओढवली असती. परिणामी त्याचा खर्च 615 कोटी रुपयांवर पोहचला असता.

चालू महिन्यातही बचत होणार
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरण महानिर्मिती, एनटीपीसी, खासगी प्रकल्प आणि पॉवर एक्स्चेंजमधून वीज घेत आहे. चालू मे महिन्यात पॉवर एक्स्चेंजमधून 450 दशलक्ष युनिटहून अधिक वीज पॉवर एक्स्चेंजमधून घेतली जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे एप्रिलप्रमाणेच मे महिन्यातही महावितरणची मोठी बचत होणार आहे.

 कोरोना महामारीमुळे मागील वर्षी एप्रिल-मे महिन्यात महावितरणकडे विजेची मागणी 15 ते 16 हजार मेगावॅट एवढी नोंदली जात होती. देशभरातही हीच परिस्थिती होती. त्यामुळे तेव्हा महावितरणला केवळ साडेतीन रुपये प्रतियुनिट दराने 166 दशलक्ष युनिट वीज पॉवर एक्स्चेंजमधून उपलब्ध झाली होती.