
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे वेगात सुरू असून तब्बल 3 हजार किमीच्या छोटय़ा नाल्यांच्या सफाईचे काम आज पूर्ण झाले आहे. तर एकूण नालेसफाईपैकी 95 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 31 मेपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
मुंबईत दरवर्षी मार्चच्या मध्यावर सुरू होणारे नालेसफाईचे काम यावर्षी उशिरा सुरू झाले. 7 मार्च रोजी पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपल्याने नालेसफाईचे प्रस्ताव मंजुरीसाठी रखडले होते. मात्र प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर 11 एप्रिलला कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. यावर्षी वेळ कमी असल्यामुळे तीन शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले होते. नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी सर्व सातही परिमंडळात भरारी पथक आणि नागरिकांना माहिती मिळावी-तक्रार करता यावी यासाठी ‘डॅशबोर्ड’ही सुरू करण्यात आला आहे.
असे होतेय काम
z संपूर्ण मुंबईतील मोठे नाले, छोटे नाले, पावसाळी गटारे आणि मिठी नदीमधून यावर्षी 31 मेपर्यंत 909444.884 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्टय़ ठेवण्यात आले आहे. यातील 859395.82 मेट्रिक टन म्हणजेच उद्दिष्टापैकी 95 टक्के गाळ आतापर्यंत काढण्यात आला आहे.
नालेसफाईची टक्केवारी
मुंबई शहर – 83.07 टक्के
पूर्व उपनगर – 90.83 टक्के
पश्चिम उपनगर – 88.52 टक्के
छोटे नाले – 100 टक्के
मिठी नदी – 93.97 टक्के


























































