
लातूरमध्ये गोवा निर्मित अवैद्य मद्याची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईवरून आढळून आले आहे. या कारवाईत तब्बल 6 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूरच्या बार्शी रोड उड्डाण पूलाजवळ सोमवारी ॲक्टीव्हाने अवैध मद्याची वाहतूक करताना 2 बॉक्स गोवा निर्मितीचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले. पकडलेल्या आरोपींना चौकशी केली असता अवैध मद्य मे. हॉटेल अजिंक्यतारा येथे नेत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे हॉटेलवर छाप टाकला असता त्या ठिकाणी एकूण 13 बॉक्स गोव्यात तयार करण्यात आळेले विदेशी मद्य आढळून आले.
आरोपींनी दिलेल्या माहितीवरून बसवंतनगर( जि. लातूर) येथे मद्य लपविल्याचे समजले. त्यावरुन तेथे छापा टाकला असता त्या ठिकाणी 50 बॉक्स गोवा निर्मित अवैध मद्य तसेच गुन्ह्यात वापरण्यात येणार मारुती व्हॅन जप्त करण्यात आली. पुढील तपासात मौजे बोरगांव काळे( ता. जि. लातूर) येथील एका शेतात छापा टाकला असता त्या ठिकाणी 20 बॉक्स गोवा राज्य निर्मित अवैध विदेशी मद्य आढळले. तसेच एका आरोपीच्या घरी म्हाडा कॉलनी (लातूर, ता. जि. लातूर) येथे 10 बॉक्स गोवा निर्मित अवैध मद्य तसेच गुन्ह्यात वापरलेली एक होंडा शाईन दुचाकी जप्त करण्यात आली. सर्व मिळूण एकूण 95 बॉक्स गोवा निर्मित अवैध मद्य तसेच एक चारचाकी व दोन दुचाकी वाहन जप्त करण्यात आले.
गोवा बनावटीच्या जप्त अवैध विदेशी मद्याची किंमत 4 लाख 90 हजार 40 रुपये व गुन्ह़यात वापरलेल्या जप्त वाहनाची किंमत 1 लाख 90 हजार रुपये आहे. बाटली, बुचे, बॉक्स असे जप्त केलेले साहित्य असा एकूण 6 लाख 80 हजार 40 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. महेश भागवत शिंदे, दिनेश रामकिशन शिंदे, योगेश आत्माराम सांडवे, जयराम आश्रुबा पांडे, अनिल हणमंत जाधव, सोमनाथ नारायण पकाले या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील बब्रुवान रामराव सुर्यवंशी हा आरोपी फरारी आहे.





























































