कोकणात गणपती उत्सवासाठी एसटीच्या 2500 जादा गाड्या, 25 जूनपासून आरक्षण सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

एसटी महामंडळाने यंदा गणपती उत्सवासाठी कोकणात 2500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 25 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान या जादा गाड्या चालविण्यात येणार असून 25 जूनपासून त्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.

31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. यंदा कोरोना संकटानंतर प्रथमच चाकरमान्यांना गावी जाण्याची संधी मिळणार आहे. अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती सणासाठी चाकरमानी वर्षभरापासून प्लानिंग करत असतात. त्यामुळे अडीचशे बसेस यंदा सोडण्यात येणार असून 25 जूनपासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर 5 जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. कोकणात जाणाऱ्या जास्तीत जास्त चाकरमान्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ॲड.परब यांनी केले आहे.

25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील. तर 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान परतीच्या गाड्या निघतील. या बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेत स्थळावर, मोबाईल ॲपव्दारे, खाजगी बुकींग एजंटकडे उपलब्ध होणार आहे, असेही ॲड.परब यांनी सांगितले.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकं देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

येथून सुटणार गाड्या…-

मुंबई सेंट्रल (मुंबई सेंट्रल साईबाबा), काळाचौकी, गिरगांव, कफपरेड, केनेडी ब्रीज, काळबादेवी, महालक्ष्मी, परळ (परळ सेनापती बापट मार्ग, दादर ), मांगल्य हॉल( जोगेश्वरी), कुर्ला नेहरूनगर, बर्वे नगर, सर्वोदय हॉस्पिटल(घाटकोपर), टागोरनगर (विक्रोली), घाटला (चेंबूर), डी.एन नगर (अंधेरी), गुंदवली अंधेरी, सांताक्रुझ (आनंदनगर), विलेपार्ले, खेरनगर,(वांद्रे) सायन, पनवेल आगार, उरण आगार , ठाणे 1, भाईंदर, लोकमान्य नगर, श्री नगर, विटावा, नॅन्सी कॉलनी (बोरिवली), मालाड, डहाणूकरवाडी, चारकोप (कांदिवली), महंत चौक (जोगेश्वरी), संकल्प सिद्धी गणेश मंदीर (गोरेगाव), ठाणे -२ भांडूप (पूर्व आणि पश्चिम), मुलुंड (पू.) विठ्ठलवाडी, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण डोंबिवली (पश्चिम ) व (पूर्व), नालासोपारा, वसई आगार, अर्नाळा आगार आदी ठिकाणांहून गाड्या सुटणार आहेत.