कोथरुडमधील सराईत सोन्या पवार टोळीवर मोक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील कोथरुड परिसरात दहशत माजवणारा सराईत दिनानाथ उर्फ सोन्या पवार आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 89वी कारवाई आहे.

दिनानाथ उर्फ सोन्या गोरक्षनाथ पवार (वय 22, रा शास्त्रीनगर, कोथरुड), अक्षय उर्फ ज्वाला शांताराम येवले (वय 23, रा. सुतारदरा, कोथरुड), प्रदीप उर्फ पद्या भोला मिर्धा (वय 16, रा. सूस गाव, ता. मुळशी) यांच्यासह टोळीतील एका अल्पवयीन विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुचाकी तोडफोड, बेकायदा शस्त्र बाळगणे, दरोड्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारण झाली नव्हती. त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यावतीने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर केला.

त्यानंतर पवार टोळी विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील सात महिन्यात 26 सराईत टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई केली आहे.