गोव्यात कार नदीत कोसळून चार जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण गोव्यातील झुआरी पुलावरुन बुधवारी मध्यरात्री कार नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातमध्ये चौघांचा मृत्यू झाला. तब्बल 12 तासांनंतर अपघातग्रस्त डस्टर कार बाहेर काढण्यात शोधपथकाला यश आले आहे. कारमधील 4 मृतदेहही कारचा पत्रा कापून बाहेर काढण्यात आले आहेत.

झुआरी पूल दुर्घटनेतील कार बाहेर काढण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाकडून शोध आणि बचावकार्य सुरू होत आहे. तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. कारमधील चौघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कटरच्या साहाय्याने कारचा पत्रा कापून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळखही पटवण्यात आली असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.

अपघाताच्या आधी सदर कार भरधाव वेगात होती त्या कारने एका टॅक्सीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता कारच्या उजव्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्याला धडक बसली. या धडकेने पुलाचा कठडा मोडून कार नदीत पडली असे सांगितले जात आहे.

रात्रीपासून शोधकार्य सुरू होते मात्र काळोख असल्याने शोधकार्य सुरू ठेवण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान तटरक्षक दल आणि नौदल डायव्हर्सशी संपर्क साधण्यात आला होता. हे वाहन लोटली येथून पणजीच्या दिशेने येत होते. या वाहन चालकाने पुलावर ब्रेक मारल्याने त्याच्या खुणा रस्त्यावर दिसत असून ती उजव्या बाजूला वळल्याच्याही खुणा आहेत.

अपघातातील मृतांची नावं

1. आल्विन आरावजो

2. हेन्री आरावजो

3. प्रेसिला क्रुझ

4. ऑस्टिन फर्नांडिस