दाजीपुरात रिसॉर्टमधील जुगार अड्डय़ावर छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात असलेल्या दाजीपूर ओलवण येथील ऋषिकेश होम स्टेमध्ये सुरू असलेल्या जुगारअड्डय़ावर छापा टाकून राधानगरी पोलिसांनी सुमारे 11 लाख 7 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 18 आरोपींवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

महेश जोशी (रा. मालवण), महेश गांधी (रा. कणकवली), शरद गुरव (रा. खारेपाटण), दत्ता वाघमारे (रा. कणकवली), किशोर सावंत (रा. फोंडा घाट), अनिल सिलकर (रा. कणकवली), संदीप राणे, जयवंत बाईत, नीलेश हेरेकर (रा. सिंधुदुर्ग), रामचंद्र धुरसोळे, सुधीर गांधी (रा. खारेपाटण), दिनेश जैतापकर (रा. राजापूर), अल्पेश गांधी, प्रकाश साळवी (रा. फोंडा), विशाल मोहिते (रा. मालवण), विनायक शिर्के, मिलिंद कुबडे (रा. फोंडा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात ओलवण गावच्या हद्दीत विलास तुकाराम पाटील यांच्या मालकीचे हृषिकेश होम स्टे आहे. ओलवण दाजीपूर येथील ऋषिकेश विलास पाटील याने रिसॉर्टमध्ये रमी नावाचा जुगारअड्डा सुरू केला होता. याची कुणकुण राधानगरी पोलिसांना लागताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात 1 लाख 37 हजार 280 रुपयांची रोकड, 45 हजार 500 रुपयांचे सहा मोबाईल, अल्टो कार, तवेरा, वॅगनर, एस. क्रॉस अशा 9 लाख 25 हजार किमतीच्या चार चारचाकी गाडय़ा असा 11 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.