चले जाव चले जाव… काळी टोपी चले जाव…! राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात मालवणात शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राज्याभरात संतापाचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर मालवण शिवसेनेने शहर शिवसेना शाखा येथे एकत्र येऊन त्या वक्तव्याविरोधात जोरदार निदर्शने केली. “चले जाव चले जाव… काळी टोपी चले जाव” अशा स्वरूपाची घोषणाबाजी करत प्रातिनिधिक स्वरूपात आणलेल्या काळ्या टोप्या शिवसेना पदाधिकारी यांनी जमिनीवर फेकल्या.

राज्यपाल राज्यातील प्रमुख असे घटनात्मक पद असताना एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याप्रमाणे राज्यपाल वागत आहेत, असे चित्र दिसत आहे. महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करणारे वक्तव्य त्यांनी केले असून या वक्तव्याचा मालवण तालुका शिवसेना निषेध करत आहे. त्यांनी या पदावरून पायउतार व्हावे, अशी महाराष्ट्रातील जनता म्हणून आमची भूमिका असल्याचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले.

मालवण शिवसेना शाखा समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवा तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख अमित भोगले, सोमनाथ माळकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, ज्याप्रमाणे देशाचा प्रमुख राष्ट्रपती असतात, त्याप्रमाणे राज्यपाल हे प्रत्येक राज्याचे प्रमुख व्यक्ती असतात. असे असताना राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी केलेले एक विधान महाराष्ट्र आणि मराठी माणसाला कमी लेखण्याचे ठरावे असे होते. त्यांच्या पदाला घटनात्मक अधिकार आहे. परंतु याचा त्यांना विसर पडला असून एखाद्या पक्षाचे पदाधिकारी असल्याप्रमाणे त्यांच्याकडून सातत्याने वक्तव्य होताना दिसत आहेत. शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई नाना शंकर शेठ या मराठी माणसाने घडवली. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायची शिकवण दिली. शिवसेना मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी नेहमीच रस्त्यावर उतरली असून महाराष्ट्राच्या विरोधात कोणीही वक्तव्य करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. आपले राज्य प्रगतीकडे कसे जाईल, हे पाहणे राज्यपालांचे काम असते. मात्र या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम होते आहे का असे चित्र दिसत आहे. मराठी माणसाचा अपमान होत असेल तर निषेधार्ह आहे, अशा शब्दात हरी खोबरेकर यांनी टीका केली आहे.