
शेवटच्या क्षणापर्यंत जुलूमशाहीविरोधात लढत राहू; महाराष्ट्राचा पराक्रम काय असतो हे अन्याय करणाऱयांना दाखवून देऊ.
एका वेगळय़ाच पर्वाला सुरुवात झाली आहे. सरन्यायाधीश बोलले होते की, विरोधी पक्षाला दुश्मन समजू नका, पण आता विरोधी पक्ष तर लांबच आहे, पण एकेकाळी मित्रपक्ष होता त्याचासुद्धा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जातोय. संजय राऊत यांच्यावरील ‘ईडी’ची कारवाई हा याचाच एक भाग आहे. हिंदूंचा, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय, त्याचाच गळा घोटायचा हा डाव आहे. हे सगळे कारस्थान लाज, लज्जा, शरम सोडून चाललेले आहे. ही सर्व कारस्थाने उलथून टाकण्याची आज गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, तिथला पराक्रम काय असतो हेसुद्धा आपल्यावर अन्याय करणाऱयांना दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
ठाण्यातील शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. या वेळी शिवसेना खासदार राजन विचारे, धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हेही उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ईडीच्या कारवायांचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, आपण आज इथे बोलत आहोत आणि संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पाहुणे येऊन बसलेत. कालपासून एक सुरुवात झाली आहे. हे काय कारस्थान आहे? हे कारस्थान हेच आहे, काल जे कोश्यारी बोलले, मराठी माणसांचा अपमान त्यांनी केला. मराठी माणसाचे मीठ खाऊन नमकहरामी केली. त्याचाच हा पुढचा टप्पा आहे.
फोन आला की हातातले सर्व सोडून दिल्लीला पळतात
‘मातोश्री’ निवासस्थानी आलेल्या ठाण्यातील शिवसैनिकांचे स्वागत करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या घरात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हे ‘मातोश्री’शी असलेलं नातं काही जणांना खुपायला लागलं. कारण त्यांना ‘मातोश्री’ने जास्तच प्रेम दिलं होतं. त्या प्रेमाचे काटे त्यांना टोचायला लागले आणि म्हणून ते पलीकडे गेले. पलीकडे गेले ते गेले, फोन येण्याचा अवकाश, हातचं सोडून दिल्लीला पळतात. कालसुद्धा कसे पळाले ते तुम्ही पाहिलेत. असे गेल्या अडीच वर्षांत कधीच झाले नव्हते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून दिमाखाने, शानदारपणे कारभार करण्याचा प्रयत्न केला. कोणतेही दडपण माझ्यावर नव्हते. जेवत असताना जरी बेल वाजली आणि जेवण अर्धवट टाकून पळत या असे सांगितले म्हणून पळत जाणारा मी मुख्यमंत्री नव्हतो. आता मात्र काही काळापुरती का होईना, उलट परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीरांचा समाचार घेतला.
महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱयाची पत्रास बाळगणार नाही!
कालच मी सांगितलं आहे की, कोश्यारींनी महाराष्ट्र का घी देखा, पण कोल्हापूर का जोडा नही देखा. महाराष्ट्राच्या मुळावर येणारा, मग तो कोणीही असला तरी आम्ही त्याची पत्रास बाळगणार नाही. त्याचा आदर तर शक्यच नाही आणि त्याला महाराष्ट्र म्हणून काय आहे ते दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
महाराष्ट्राचा अपमान झाल्यावरही गुळमुळीत, मुळमुळीत प्रतिक्रिया देता?
आज जे भाजपच्या चरणी दास झाले आहेत, त्या दासांची प्रतिक्रिया काय होती… आम्ही पत्र लिहू, आम्ही नाराजी व्यक्त करू. अरे हट, आमच्या राज्याचा अपमान झाल्यानंतरसुद्धा अशी गुळमुळीत, मुळमुळीत प्रतिक्रिया देणार असाल तर धर्मवीर दिघेंच्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला हे मान्य नाही. महाराष्ट्राचा अपमान झाला तरी चालेल, पण आम्ही तुमचे जोडे वाहणारच, ही शिकवण शिवसेनाप्रमुखांची आणि आनंद दिघेंची नव्हती, असा टोला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.
या भंपक धमक्यांना काही अर्थ नाही!
आनंद दिघे यांच्याबाबत काय घडले याबद्दल मी वेळ आल्यावर बोलेन, अशी धमकी देणाऱया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिघे यांचे पुतणे केदार यांनी चोख उत्तर दिले. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, गेली 25 वर्षे तुम्ही का गप्प बसला होतात? तुम्हाला आमदार केलं, मंत्री केलं, सगळं दिलं, मग एवढी वर्षे हे गुपित का फोडावेसे वाटलं नाही? या सर्व भंपक धमक्या सोडून द्या. या धमक्यांना काही अर्थ नाही.
शिवसेनाप्रमुखांचा, धर्मवीरांचा शिवसैनिक दडपणाला घाबरणारा असूच शकत नाही
मला एका गोष्टीचा अभिमान आहे की, ज्यांना आपण मोठं केलं ती मोठी झालेली माणसे शेफारली आणि तिकडे गेली. हे सगळं घडलं त्या दिवशी पहिल्यांदा मी अनिताताईंना फोन केला. ही शिवसेनेची वाघीण आहे. त्यांनी एका क्षणात सांगितले, साहेब, मी ‘मातोश्री’ची आहे. मला काहीही जबाबदारी द्या, मी शिवसैनिक आहे आणि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही, असा आवर्जून उल्लेख करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आज जे काही लोभापायी, दमदाटीपायी तिकडे जाताहेत, दडपणाला घाबरणारा बाळासाहेबांचा आणि ठाण्यातील आनंद दिघेंचा शिवसैनिक असूच शकत नाही. आनंद दिघे दोन वर्षे तुरुंगात होते, पण घाबरले नाहीत. म्हणून त्यांना धर्मवीर म्हणतात. मेलो तरी बेहत्तर! शिवसेना सोडणार नाही. पक्षाची निष्ठा कशी असते हे दाखवणाऱया धर्मवीरांचे नाव जे घेताहेत त्यांच्या तोंडी ते शोभत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फुटीरांना फटकारले.
महाराष्ट्राच्या मातीत वीर जन्माला घालण्याची परंपरा कोणी संपवू शकलेले नाही!
अजूनही मराठी मातीमध्ये वीर जन्माला घालण्याची परंपरा कोणी संपवू शकलेले नाही. ज्या वेळी संपूर्ण हिंदुस्थान हिरव्या वरवंटय़ाखाली चिरडला जात होता तेव्हा एक तेज महाराष्ट्रात शिवनेरीमध्येच का जन्माला आले? कारण महाराष्ट्राच्या मातीची आणि मातेची ही एक महती आहे. त्यामुळे असे किती जरी आले तरी ही परंपरा संपवू शकत नाहीत. त्या मातेला आणि मातीला स्मरून एकच सांगेन की, शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, तिथला पराक्रम काय असतो हेसुद्धा आपल्यावर अन्याय करणाऱयांना दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईडीआडून कारवाया करणाऱया भाजपला ठणकावले.
मराठी माणसाला चिरडून टाकण्याचे भाजपचे कारस्थान
भाजपचे कारस्थान आहे की, हिंदुत्वात फूट पाडायची, मराठी-अमराठी करायचे आणि मराठी माणसालाच चिरडून टाकायचं. शिवसेना का संपवायची, कारण हिंदूंना आणि मराठी माणसाला ताकद देणारी ही संघटना आहे. ही एकदा संपली की महाराष्ट्र यांना चरायला मोकळा झाला, मोकळं कुरण यांना मिळालं. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना एकदा का नाते तुटले की जी राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची आहे. पण हे नाते कधीही तुटणार नाही… प्रयत्न तर करून बघा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.































































