
कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत हिंदुस्थानच्या सुधीरने गुरुवारी पुरुषांच्या हेवीवेट अंतिम फेरीत विक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. कॉमनवेल्थ गेम्सच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सुधीर हा पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 134.5 च्या विक्रमी स्कोअरसह 212 किलो वजन उचलून हे सुवर्णपदक जिंकले. मात्र शेवटच्या प्रयत्नात सुधीरला 217 किलो वजन उचलण्यात अपयश आले.
नायजेरियाच्या इकेचुकवू क्रिस्टियन उबिचुकवू याने 133.6 गुणांसह रौप्यपदक तर स्कॉटलंडच्या मिकी युलने 130.9 गुणांसह कांस्यपदक जिंकले. ख्रिश्चनने 197 किलो तर युलने 192 किलो वजन उचलले. तर मनप्रीत कौर आणि सकिना खातून महिलांच्या लाइटवेट फायनलमध्ये अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिल्या, तर पुरुषांच्या लाइटवेट फायनलमध्ये परमजीत कुमार तिन्ही प्रयत्नांत अयशस्वी झाल्याने शेवटच्या स्थानावर राहिला.
मनप्रीतने पहिल्या प्रयत्नात 87 किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात 88 किलो वजन उचलले. मात्र तिसऱ्या प्रयत्नात 90 किलो वजन उचलण्यात ती अपयशी ठरली. मनप्रीतला 89.6 गुण मिळाले आहेत. तर सकीनाला पहिल्या प्रयत्नात 90 किलो वजन उचलण्यात अपयश आले. तर 93 किलो वजन उचलण्याचा तिचा तिसरा प्रयत्न अयशस्वी झाला. तिला 87.5 गुण मिळाले आहेत.
इंग्लंडच्या जो न्यूसनने 101 किलो वजनी गटात 102.2 गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. तर ऑलिव्हिया ब्रूमने 100 गुण मिळवत 111 किलो वजनाच्या सर्वोत्तम प्रयत्नात रौप्य पदक जिंकले. केनियाच्या हेलन वाविरा कारियुकीने 98.5 गुणांसह 97 किलो वजनी सर्वोत्तम प्रयत्नांसह कांस्यपदक जिंकले.



























































