
>> नामदेव सदावर्ते
ज्ञानी पुरुष जगद्व्यापारात केवळ भगवंत पाहतो. सृष्टीतील जीवमात्रात तो भगवंत पाहतो. दागिन्यांतील विविध आकारात केवळ सोने पाहणारा विश्वातील भेद न पाहता अभेदरूप ईश्वर पाहतो. या अनुभवासाठी आत्मज्ञानसंपन्नता असावी लागते. जमिनीखाली असलेले लोखंड गंजते. माती लोखंडाला नष्ट करते. पण तेच लोखंड मातीऐवजी परिसाच्या संगतीत आले तर त्याचे सोने होते. संत ज्ञानेश्वर यांच्या जयंतीनिमित्त…
या विश्वात सर्वत्र विविधता आहे. प्राणी, पशू-पक्षी, मानव या सर्वात विविधता आढळते. मानवात अनेक धर्म, जाती असून या सर्वात चैतन्यतत्त्व, प्राणशक्ती एकच आहे. या जगातील विविधतेतही एकता पाहणाऱ्या संतांनी विविध दृष्टांत देऊन ही एकात्मता सांगितली आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात – देव्हाऱ्यात भगवती चंडिका मातेची सोन्याची मूर्ती असून तिच्या हातात त्रिशूळ आहे आणि तिने महिषासुराला त्या त्रिशूळाने ठार मारलेले दिसत आहे. त्रिशूळ, महिषासुर व देवीमाता हे तीन वेगवेगळे दिसत असले तरी ते फक्त एका सोन्याचेच घडवलेले आहेत.
सोनयाचिया चंडिका । सुवर्णशूळेचि देखा ।
सोनयाचिया महिखा । नाशू केला ।। 18.444
सोनाराकडील मूस या धातू आटविण्याच्या पात्रात सोन्याचे सर्व प्रकारचे लहान-मोठे दागिने उष्णतेवर वितळतात. सर्व दागिने आटून सोन्यात रूपांतरीत होतात. मुसीमध्ये अलंकार आटून गेल्यावर ते त्यांच्या नाम-रूपासह नष्ट होतात व फक्त सोनेच शिल्लक राहते. ज्ञानराज म्हणतात –
नातरी लेणियांचे ठसे । आटोनि गेलिया मुसे ।
नाम-रूप-भेदे जैसे । सांडिजे सोने ।। 18.1109
एका आरशाने दुसऱ्या आरशात पाहणे हे न पाहण्यासारखेच आहे. हे अद्वैत आहे. सोने झाकण्यासाठी दुसरा धातू असावा लागतो. सोने सोन्याला झाकू शकत नाही. ज्ञान अज्ञानाखाली झाकलेले असते. गुरू व शिष्य हे दोघे असतील तरच अध्यात्मज्ञानाचे प्रतिपादन होईल, अन्यथा ज्ञानाची देवाणघेवाण घडणार नाही.
सोन्याला दागिना रूप आल्यानंतर सोने झाकले जात नाही, हे सांगताना ज्ञानराज म्हणतात – सर्व जगतातील विविधता पाहता ईश्वर झाकला गेला असे वाटते, पण जगत्रूपाने तो ईश्वरच प्रकट झालेला असतो.
अलंकाराते आले । तरी सोनेपण काई गेले ।
की कमळ फाकले । कमळत्वा मुके ।। 14.124
त्याप्रमाणे अनेकविध अलंकाराच्या रूपाने सर्वत्र सोनेच प्रकट होत असते. तसे जग अनेकत्व रूपाने जरी दिसत असले तरी सर्व जगतात ईश्वरच आहे.
की नाना अलंकार दशें । सोने न लपत लपाले असे ।
विश्व न होनियां तैसे । विश्व जो धरी ।। 15.551
अलंकार पाहताच लोक म्हणतात, दागिने फारच सुंदर आहेत. दागिन्यांतील सोने प्रथमदर्शनी दिसत नाही.
लेणे सोनेचि जो जाणे । तो लेणेपण ते वावो म्हणे ।
तेवि मी जाणोनि जेणे । वाळिला भेदू ।। 15.561
ज्ञानी पुरुष जगद्व्यापारात केवळ भगवंत पाहतो. सृष्टीतील जीवमात्रात तो भगवंत पाहतो. दागिन्यांतील विविध आकारात केवळ सोने पाहणारा विश्वातील भेद न पाहता अभेदरूप ईश्वर पाहतो. या अनुभवासाठी आत्मज्ञानसंपन्नता असावी लागते. जमिनीखाली असलेले लोखंड गंजते. माती लोखंडाला नष्ट करते. पण तेच लोखंड मातीऐवजी परिसाच्या संगतीत आले तर त्याचे सोने होते. मग त्या सोन्याला माती चिकटत नाही. लोखंडाने मातीची संगत केली तर त्याचे आयुष्य हळूहळू नष्ट होते. पण त्याच लोखंडाला क्षणभर परिसाची संगत लाभताच त्याचे सोने होते. त्यानंतर त्या सोन्याला माती स्पर्श करीत नाही.
लोह उभे खाय माती । ते परिसाचिये संगती ।
सोने जालया पुढती । न शिविजे मळे ।। 18.1407
संतांचे जीवन कसे असते हे सांगताना ज्ञानराज म्हणतात, संतांच्या अंतरात आत्मज्ञान असते व त्यांचे कर्माचरण शुद्ध असते. ज्याप्रमाणे अग्नीतून तावून सुलाखून निघालेले सोने शुद्ध असते. त्या शुद्ध सोन्याचा सुंदर घडा तयार करून त्यात अमृतासारखे पवित्र गंगाजळ भरलेले असावे त्याप्रमाणे संत अंतर्बाह्य पवित्र असतात.
आतां निर्वाळूनि कनकें । भरिला गांगे पियुखें ।
तया कलाशाचिया सारिखे । शौच्य असे ।।
कर्माचे निष्काम आचरण, तसेच अंतःकरण अध्यात्मज्ञानसंपन्न अशा सत्पुरुषाला उपमा देताना ज्ञानराज वरीलप्रमाणे सुवर्णकळशाची उपमा देतात. लोखंडाचे आकार आणि वजन कमी न करता त्याचे परिस शुद्ध सोने करतो. तसे संतजन कोणाचेही अंतःकरण न दुखावता सर्व जिवांचा विकास करतात. पाणी मोठय़ा झाडांच्या मुळाशी जाताना इतर तृणांचाही पाणी देऊन विकास साधतात. ज्ञानराज म्हणतात –
तरी लोहाचे अंग तुक । न तोडितांचि कनक ।
केले जैसे देख । परिसे तेणें ।। 17.216
वस्तूच्या सामर्थ्य शक्तीचे वर्णन करताना ज्ञानराज सांगतात – लोखंडाचे सोने होते खरे पण तसे करण्याचे बळ, सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे किंवा अमृत प्राप्त झाले तरच मृताला जीवंतपणा प्राप्त होतो.
लोहाचे कनक होये । हे सामर्थ्य परिसींच आहे ।
कां मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ।। 1.77
जेव्हा हिणकस धातू सोन्यात मिसळलेला असतो तेव्हा ते तसे सोनेच असते; पण तो हिणकस धातू काढून टाकला की मग ते सोने शुद्ध सोने होते. केवळ एका गुणदोषामुळे मानवी आचरण दूषित होते. तो दोष नष्ट केल्यावर माणसाचे आचरण शुद्ध होते.
पै जेव्हांही असे किडाळ । तेव्हांही सोनेचि अढळ ।
परी ते कीड गेलिया केवळ । उरे जैसे ।।
सोन्याचे अलंकार तयार केल्यावरही त्याचे सोनेपण मोडत नाही. विविध आकारांचे हे दागिने अंगावर जो घालतो त्याच्या दृष्टीने ते अलंकार असतात.
जरी सोने लेणे होऊनि घडे । तरी तयाचे सोनेपण न मोडे ।
येर अलंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावे ।।
सुवर्णाहून भिन्न न होता अलंकार सोन्याशी अभिन्न व अनन्य असतो. तसे प्रकृती पुरुषाचे एकत्व असते. प्रकृती पुरुषाचे एकरूप होणे हेच माझे वंदन होय.
परी सोने नशी दुजें । नव्हतु लेणे सोना भजें ।
हे नमन करणे माझे । तैसे होय ।।
अलंकार आणि सोने एकच असते. जळ आणि तरंग एकच असते. ज्वाळा आणि अग्नी एकच असते. लाटा पाण्यात निर्माण झाल्या व नष्ट झाल्या तरी पाणी आणि लाटा एकरूपच असतात. सोन्याने सोने पांघरले तर काय झाकले जाईल?
गीतार्थाचे वर्म प्रकट करणे किती अवघड आहे हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात – हे सारे भूमंडळ शुद्ध सोन्याचे ओतीव करता येईल. सातही समुद्र अमृताने भरता येतील. चिंतामणी रत्नाचे पर्वत करता येतील. कल्पतरूंची महावने करता
येतील, पण गीतार्थाचे वर्म प्रकट करता येणे अतिअवघड आहे.
जी कनकाचे निखळ । ओतु येईल भूमंडळ ।
चिंतारत्नी कुळाचळ । निर्मू येती ।।





























































