
सभागृह हे लोकांचं आशास्थान असतं कारण तिथे लोकांच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम केलं जातं. तिथे लोकप्रतिनिधींनी एका मर्यादेत वागणे गरजेचे आहे. त्या मर्यादांचं भान नीलम गोऱ्हे लोकप्रतिनिधींना लक्षात आणून देत आहेत. सभागृहात नेत्यांनी कसे वागायला हवे हे नीलम गोऱ्हे यांनी नुकतेच खडसावून सांगितले. तो कोण होता हे महत्वाचे नाही. सभागृहात मंत्री असो वा कोणी असो सभागृहाचं पावित्र्य हे राखलं गेलच पाहिजे. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या त्या पदाला योग्य न्याय दिला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सभागृहाची उंची आणि दर्जा तुम्हाला पाळावाच लागेल. तुम्ही कोणीही असाल ते तुमच्या घरी. उद्या मुख्यमंत्री जरी चुकीचे वागले तरी त्यांची कानउघडणी नीलम गोऱ्हे यांनाच करावी लागणार आहे. असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या उपनेत्या व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापती पदाच्या कार्यकाळातील कार्यासंदर्भात अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालाच्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला
यावेळी ते म्हणाले की कोणताही सामाजिक विषय मी नीलम गोऱ्हे यांच्यावर सोपवला आणि तो अर्धवट राहिला असे कधीच झाले नाही. अनेकदा एखादी घटना घडल्यानंतर गोऱ्हे यांचा थेट घटना स्थळावरून मला फोन यायचा. अशी वृत्ती एखाद्या महिलेमध्ये क्वचित पहायला मिळते. मी महिला आहे तर मी कशी जाऊ?, कसं करू? अशी तक्रार त्यांनी कधीही केली नाही. दिवस रात्र हा त्यांच्यासाठी एकच होता.
भंडारा गोंदिया अत्याचाराच्या घटनेबाबत ते म्हणाले की शाहू फुलेंच्या महाराष्ट्रात दुर्दैवाने अशा घटना घडत आहेत. शिवसेनेने त्या प्रश्नावर वेळीच आवाज उचलला कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये असं घडत कामा नये. महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये जात धर्म पहिला जाऊ नये. मग ती बिल्किस बानो असो की भंडाऱ्यातील महिला. ज्यावेळेस निर्भया बलात्कार प्रकरण झाले, त्यावेळेस संपूर्ण देश हादरला होता. तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याला दया माया क्षमा नाही, ही गोष्ट सर्व पक्षांनी लक्षात घेतली पाहिजे. महिलांच्या बाबतीत काही घडल्यास सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र यायला हवे. तुमचे सरकार आहे म्हणून आम्ही बोंबलतो आणि आमचे सरकार आहे म्हणून तुम्ही बोंबलात याला काही अर्थ नाही. या घटनांच्या विरोधात सर्व महिलांनी एकत्र यायला हवे. अनेकदा घरात लहान मुलींना त्यांच्या दिसण्यावरून किंवा वर्णावरून बोलले जाते. मात्र याचा गंभीर परिणाम त्यांच्यावर होतो. परंतु या सर्व बाबतीत सर्वांचे डोळे उघडण्याचे काम नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.































































