
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱयांसाठी राबविण्यात येणाऱया कडबाकुट्टी योजनेला यंदा कात्री लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील केवळ शेतकऱयांना 277 कडबाकुट्टी यंत्राला अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कडबाकुट्टी यंत्रे संगमनेर तालुक्यात मिळणार असून, सर्वात कमी यंत्रे जामखेड तालुक्याला मिळणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱया विविध योजनांपैकी कडबाकुट्टी योजना ही खूप लोकप्रिय आहे. मात्र, यंदा 52 लाख तरतुदीवरून कडबाकुट्टी योजनेसाठी केवळ 25 लाखांची तरतूद करण्यात आली असल्याने पर्यायाने अनुदानित कडबाकुट्टीला शेतकरी मुकणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात कृषी विभागाला अवघ्या 57 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी कडबाकुट्टी योजनेला मोठी मागणी असल्याने एकूण 57 लाखांच्या तरतुदीपैकी 25 लाख रुपये कडबाकुट्टीसाठी ठेवण्यात आलेले आहेत.
कृषी विभागाने लोकसंख्या आणि 85 जिल्हा परिषद गट गृहीत धरून कडबाकुट्टी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. यात सर्वाधिक लाभ संगमनेर तालुक्याला मिळणार असून, याठिकाणी 31 कडबाकुट्टी यंत्राला अनुदान मिळणार आहे. तर, सर्वात कमी कडबाकुट्टी यंत्रे ही जामखेड तालुक्याला मिळणार आहेत. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांनी कडबाकुट्टीचे अनुदान हे तालुक्याला वर्ग केले असून, त्याठिकाणी पात्र लाभार्थी शेतकऱयांना कडबाकुट्टीचे अनुदान मिळणार आहे.
असा मिळतो लाभ
जिल्हा परिषद कृषी विभाग हा सेस फंडातून शेतकऱयांसाठी कडबाकुट्टी अनुदान योजना राबवते. या योजनेत बाजारातून शेतकऱयांनी कडबाकुट्टी यंत्र खरेदी करून त्या यंत्राच्या मूळ किमतीचे 50 टक्के अनुदान अथवा जास्तीत जास्त 9 हजार रुपयांपर्यंत अनुदान शेतकऱयांना देण्यात येते. दरवर्षी शेतकऱयांमध्ये या योजनेसाठी मोठी स्पर्धा असते. तसेच सदस्यदेखील आपल्या गटात जास्तीत जास्त अनुदान मिळवण्याच्या प्रयत्नात असतात.






























































