उष्णतेची जागतिक लाट आणि अन्नसंकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन 

सध्या युरोप, अमेरिका, चीन आणि पाकिस्तानमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे, ज्यामुळे अन्ननिर्मितीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. युरोप आणि अमेरिकेच्या पर्यटनावरही या उष्णतेचा परिणाम होत आहे. उष्णतेची लाट पाश्चिमात्य देशांसाठी शापच ठरत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. चीनमध्येसुद्धा मोठय़ा प्रमाणामध्ये पाणीसंकट आणि अन्नसंकट निर्माण झालेले आहे.

सध्या ग्लोबल वॉर्निंगमुळे युरोप, अमेरिका, चीनचे काही भाग आणि पाकिस्तानमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे, ज्यामुळे अन्ननिर्मितीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अमेरिका आणि युरोप खंडाच्या मोठय़ा नद्या आटत चालल्या आहेत. फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवरील डूब नदी, इटलीची पो नदी, ब्रिटनची थेम्स नदी आणि अमेरिकेची कोलोरॅडो नदी आटली आहे. या नद्यांच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, शेती, उद्योगधंद्यांसाठी होत होता. युरोपमध्ये 40 डिग्रीच्या पुढे तापमान गेले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कारण इथल्या लोकांना उष्णता माहीत नाही. वातानुकूलित यंत्रणा इथल्या सामान्य लोकांच्या घरात नाहीत आणि उष्णतेच्या माऱयाने इथे शेकडो लोक मृत्युमुखी पडले. इथले रेल्वे रूळही पांढऱया रंगाने रंगवण्यात आले. कारण उष्णतेमुळे रेल्वेचे रूळ वितळू नयेत. अचानक ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूत वाढ झाली. तापमानाची झळ असह्य होऊन कित्येक जण सहलीला गेले. ज्यांना वृद्धापकाळामुळे शक्य झाले नाही ते घरीच राहिले. मात्र उष्णतेने ते आजारी पडले.

अमेरिकेची परिस्थितीही काही वेगळी नाही.अमेरिकेत टेक्सास भागात 45 टक्के भाग दुष्काळग्रस्त आहे. जिथे 10 ते 11 डिग्री तापमानही जास्तच वाटते, तिथे तापमान 40 ते 50 डिग्री झाले तर लोक कसे सहन करतील? इथली वन संपदाही या उष्णतेने कोलमडणार आहे. कारण युरोप आणि अमेरिका खंडातील वृक्ष आणि मानवाव्यतिरिक्त इतर जीवही उष्णतेशी जुळवून घेणारे नाहीत. या खंडातील वृक्षराजी थंड तापमानात तग धरणारी आहे. त्यामुळे वृक्ष आणि जंगलं होरपळली जात आहेत. युरोप आणि अमेरिकेच्या पर्यटनावरही या उष्णतेचा परिणाम होत आहे. उष्णतेची लाट पाश्चिमात्य देशांसाठी शापच ठरत आहे. या सगळ्याचा परिणाम अमेरिका आणि युरोपच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.

पाकिस्तानदेखील सध्या अतिशय गंभीर टप्प्यातून जात आहे. प्रचंड कर्जाशिवाय देशातील तीव्र ऊर्जा संकट, अन्नधान्य टंचाई आणि सतत वाढणारी बेरोजगारी अशा अनेक समस्यांचा प्रामुख्याने विचार करावा लागत आहे. राजकीय उलथापालथीतून आता आर्थिक संकटाकडे वाटचाल करणाऱ्या पाकिस्तानमध्ये जलसंकटाच्या समस्येनेही गंभीर रूप धारण केले आहे. परिणामी, आधीच दिवाळखोरीच्या मार्गावर असलेली अर्थव्यवस्था जलसंकटाच्या तीव्र झळा सोसत असून यातून सावरण्यासाठी पाकिस्तान हतबलच आहे. सिंध, बलुचिस्तान आणि पाकिस्तानच्या सर्वात समृद्ध अशा पंजाब प्रांतातही यंदा 75 टक्क्यांपर्यंत पाणीटंचाई आहे.

जगातल्या गहू आणि बाजरीच्या निर्यातीपैकी जवळ जवळ एक तृतीयांश निर्यात रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधूनच होते. या दोन्ही देशांचा जगातल्या एकूण सूर्यफूल तेलाच्या निर्यातीत 75 टक्के वाटा आहे. युक्रेन मक्याचाही प्रमुख पुरवठादार आहे. रशिया खतासाठी आवश्यक असणाऱया विविध घटकांची मोठय़ा प्रमाणात निर्मिती करतो. म्हणूनच खतनिर्मितीवर परिणाम झाला तर सरळ सरळ 50 टक्के अन्ननिर्मितीवर संकट येणार आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर अन्न टंचाई निर्माण होणार असून धान्याच्या किमतीत वाढ होण्याची भीती ‘यारा इंटरनॅशनल’ या जागतिक आस्थापनानेही व्यक्त केली आहे. युरोप,अमेरिकेमधील उष्णतेच्या लाटेमुळे अन्नसंकट निर्माण झाले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. चीनमध्येसुद्धा मोठय़ा प्रमाणामध्ये पाणी संकट आणि अन्नसंकट निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर या वेळेस हिंदुस्थानात झालेला पावसाळा अत्यंत समाधानकारक होता. बहुतेक सगळ्या पिकांचे यंदा रेकॉर्ड उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंदुस्थानला अन्नधान्य बाहेरून आयात करण्याची वेळ येणार नाही.

जागतिक सरासरी तापमानवाढ 2 अंश सेल्सियसपर्यंत गेल्यास हिंदुस्थानी उपखंडाला याचा सर्वात मोठा फटका बसणार असून हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश आदी देश उष्णतेच्या लाटांनी होरपळून निघण्याची भीतीही आयपीसीसीच्या अहवालात वर्तविण्यात आली आहे. तापमानवाढ न रोखल्यास अन्नधान्याची मोठय़ा प्रमाणात कमतरता निर्माण होऊन त्यांच्या किमती वाढणे, अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होणे, नद्या आटून पाण्याची टंचाई निर्माण होणे, महागाई वाढणे व परिणामी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन प्रचंड प्रमाणात गरिबी वाढणे आणि लोकसंख्येची मोठी स्थलांतरे होणे आदी धोके वर्तविण्यात आले आहेत. कर्कवृत्ताच्या जवळ असलेल्या हिंदुस्थानातील कोलकाता व पाकिस्तानमधील कराची या प्रमुख शहरांसह आसपासच्या प्रदेशाला उष्णतेच्या लाटांचा मोठा फटका बसणार आहे. उष्णतेच्या लाटांचा फटका पुढील वीस-तीस वर्षांत हिंदुस्थानी उपखंडाला बसण्याची भीती असून हिंदुस्थानातील महानगरे उष्णतेमुळे घुसमटण्याची व ‘शहरी उष्णतेचे केंद्र’ बनण्याची भीतीही या अहवालात वर्तविण्यात आली आहे. म्हणून ग्लोबल वार्ंमग थांबविण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

 [email protected]