धक्कादायक..! बापानेच विष पाजून दोन मुलांची केली हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोटच्या दोन मुलांची बापानेच विष पाजून हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने जिल्हा हादरला आहे. घटने मागील नेमके कारण काय ? हे अद्याप कळू शकले नाही.

वरोरा शहरालगत बोर्डा या गावामध्ये कांबळे परिवार राहत असून संजय श्रीराम कांबळे हे शिकवणी वर्ग घेण्याचे काम करत होते. गेल्या काही दिवसापासून मानसिक परिस्थिती ढासळल्याने शिकवणी वर्ग सुद्धा बंद करण्याच्या मार्गावर आले होते. त्यांची पत्नी कॉलेजमध्ये कंत्राटी काम करत असून संसार सुरळीत चालला होता.

मात्र या सुखी संसाराला वडिलांची नजर लागली. दोन्ही मुलांना सुमित संजय कांबळे 7 वर्ष, मुलगी मिस्त्री संजय कांबळे 3 वर्ष, या दोघांनाही राहत्या घरी विष देऊन हत्या करण्यात आली. मुलाची आई घरी आल्यानंतर दार उघडून पाहताच दोन्ही मुले बेडवर पडून असल्याचे दिसतात आईने आरडाओरडा सुरू केला. लगेच दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत दोन्ही मुलाची प्राणज्योत मावळली होती. या हत्येमागील कारण अजून पर्यंत समोर आले नाही. कुटुंबातील परिवारावर शोककळा पसरली असून प्राथमिक अंदाजानुसार विष पाजून व मुलांचा गळा आवळून हत्या केली असल्याचा अंदाज वरोरा येथील उप रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात स्मशान शांतता पसरली असून वरोरा पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न करीत आहेत.