
>>प्राची सावंत
गेली दोन वर्षे महामारीच्या निर्बंधांमध्ये घालवल्यानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतीला देखील वैविध्यपूर्ण देखावे पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी या देखव्यांमर्फत सामाजिक संदेश पोहचविले जात आहेत तर काही देखव्यांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. परळ मधील सिनेमेटोग्राफर पराग सावंत याने जुन्या आठवणींना उजाळा देत आठवणींची गोधडी हा देखावा साकार केला आहे.

या देखव्यामध्ये आजी आपल्या चिमण्या नातवाला घास भरवताना दिसत आहे. तर एकीकडे काही मुले गोट्या खेळताना दिसत आहेत. या देखव्यामध्ये आठवणींची ट्रंक देखील आहे, या ट्रंकेत जुनी बसची तिकिटे, रेडियोची कॅसेट, शाळेचा गणवेश, खिशामध्ये पेन्सिल, टपाल पत्रे, चुन्याची डबी, अडकित्ता, एसटी इ. प्रतिकृती आहेत. गणेशमूर्तीच्या चौरंगाखाली सार्वजनिक गणेशोत्सवाचा चलचित्र देखावा आहे. त्या खालोखाल लहानपणी खेळले जाणारे खेळ म्हणजेच भवरे, सापशिडी, कॅरम दाखवला आहे. एकीकडे चिंचा, बोरा, कैऱ्या, करवंदाची टोपली आहे. गणपतीच्या डाव्या बाजूला खानावळीचा डब्बा, मुंबईचे डब्बेवाले, पाटा वरवंटा, उन्हाळ्यात केले जाणारे पापड, कुरडया, लोणच्याची बरणी ठेवली आहे. अशा कित्येक जुन्या गोष्टींमुळे मन नक्कीच आपल्या बालपणात फेरफटका मारून येते.

पिढी मागोमाग पिढी बदलत जाते, पण आठवणी तशाच राहतात. गणेशमूर्ती मागे लावलेली रंगीबेरंगी मायेची, आठवणींची गोधडी तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा नक्कीच जुन्या आठवणींमध्ये रमवेल. धकाधकीच्या या जीवनातील काही क्षण आनंद अनुभवल्याचे समाधान मिळेल.



























































