आयटीआयचे 70 टक्के प्रवेश; फेरपरीक्षा उत्तीर्ण, प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आतापर्यंत 70 टक्के प्रवेश झाले आहेत. आयटीआय प्रवेशाच्या एकूण 1 लाख 50 हजार 116 जागा उपलब्ध आहेत. यापैकी 1 लाख 5 हजार 672 प्रवेश झाले आहेत. नुकताच दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच अद्याप आयटीआय प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची आणखी एक संधी देण्यात आली असून विद्यार्थ्यांना 11 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

आयटीआय प्रवेशाच्या राज्यभर 44 हजार 444 जागा रिक्त आहेत. तसेच प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांनी नव्याने संलग्नता प्रदान केलेल्या तुकडय़ांचा समावेश सद्यस्थितीत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत करण्यात आलेला आहे. उमेदवारांनी संस्थानिहाय रिक्त जागांचा तपशील अभ्यासावा व त्याप्रमाणे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीत सहभाग घ्यावा, असे आवाहन संचालक दिनकर दळवी यांनी केले आहे. आयटीआय प्रवेशाची समुपदेशन फेरी गुणवत्ता यादी 12 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. तसेच संस्थास्तरावरील गुणवत्ता यादी 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान दुपारी 1 वाजता जाहीर होईल. गुणवत्ता यादीनुसार जागांचे वाटप 13 ते 17 सप्टेंबरला होणार आहे.

मुंबई विभागात 78.31 टक्के प्रवेश

मुंबई विभागात आयटीआयचे आतापर्यंत 78.31 टक्के प्रवेश झाले असून सर्वाधिक प्रवेश सिंधुदुर्ग विभागात 84.96 टक्के झाला आहे. त्याखालोखाल पालघरमध्ये 83.31 टक्के तर रायगडमध्ये 82.42 टक्के प्रवेश झाले आहेत. ठाणे जिह्यात 79.34 तर रत्नागिरीत 75.56 टक्के विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेश घेतले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात अनुक्रमे 71.72 टक्के आणि 75.92 टक्के प्रवेश झाले असून विभागातील एकूण 20 हजार 252 जागांपैकी 15 हजार 859 जागा भरल्या आहेत.

आतापर्यंत झालेले प्रवेश
विभाग          शासकीय     खासगी     एकूण
अमरावती      14487      1288     15775
संभाजीनगर    13207      2447     15654
मुंबई           14442      1417     15859
नागपूर         13017      4935     17952
नाशिक        12984      6023     19007
पुणे            15454      5971     21425