
अमरावती येथील एका हिंदू मुलीच्या आंतरधर्मीय लग्नावरून पोलिसांनाच जाब विचारायला गेलेल्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात आकांडतांडव केला. यावेळी पोलिसांनी देखील त्यांना खाकीची झाकी दाखवत चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र नवनीत राणा यांची पोलिसांसोबतची वागणूक अत्यंत असभ्य होती त्यामुळे आज महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून राजापेठ पोलीस ठाण्याबाहेर नवनीत राणा यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच नवनीत राणा यांनी त्यांच्या वागणूकीबद्दल पोलिसांची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणा यांच्या भूमिकेबद्दल रोष व्यक्त केला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे त्यांनी टाळावे व त्यांनी तत्काळ पोलिसांची माफी मागावी, अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांनी केली. राजापेठ पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.
नवनीत राणा यांना जर एवढाच पोलिसांचा राग आहे तर त्यांनी पोलिसांची सुरक्षा नाकारावी. केंद्रात व राज्यात त्यांच्या ओळखी आहेत त्यांनी त्यांच्याकडून त्यांच्यासाठी सुरक्षा मागवावी, असे या पोलीस कुटुंबीयांचे म्हणने आहे. तसेच नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात पोहचून पोलिसांना अपमानास्पद वागणूक दिली, तसेच त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला, त्यामुळे नवनीत राणा यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या संघटनेने केली आहे.

































































