
>> डॉ. अनू विज
गरोदरपणात महिलांना वजन वाढण्याची भीती असते, परंतु पोषणयुक्त योग्य आहार घेतल्यास अनावश्यक वजनवाढ निश्चितच टाळता येऊ शकते. आहारामध्ये पोषणाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने देशभरात 1 ते 7 सप्टेंबर हा कालावधी पोषण आठवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने गरोदरपणात आरोग्यदायी वजनवाढ करण्यासाठी काय करावे, कोणत्या बाबींचा आहारात समावेश करावा, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि बाळाच्या वाढीसाठी आहारामध्ये काय महत्त्वाचे आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
गरोदरपणात सकस आणि पोषणयुक्त आहार घेतल्यास मातेचे आरोग्य चांगले राहतेच, शिवाय योग्य वजनवाढ होण्यासही मदत होते. याव्यतिरिक्त बाळाला स्तनपान करण्यासाठी आईला पुरेसे दूध येण्यासाठी आणि गर्भामध्ये बाळाची योग्य रीतीने वाढ होण्यासाठी आवश्यक पोषण आईच्या आहारामधून मिळत असते.
गरोदरपणात आईचे वजन वाढणे हे स्वाभाविक असते, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा अगदी कमी वजन वाढणे हे बाळ आणि आई दोघांच्या दृष्टीने धोकादायक असते. त्यामुळे योग्य वजनवाढीसाठी आईने सकस आहार घेणे आवश्यक आहे. आहारामध्ये पोषणयुक्त पदार्थांचा समावेश असावा. तसेच साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण एकदम कमी असावे.
काय खावे?
गरोदरकाळात शरीराच्या पोषणाची गरज भागविण्यासाठी समतोल आहार पुरेसा असतो. काही पदार्थांमध्ये सर्वाधिक पोषण असते, अशा पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करावा. बाळाच्या योग्य वाढीसाठी फॉलिएट, आयर्न, आयोडिन आणि व्हिटॅमिन ‘डी’ची आवश्यकता असते. गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी महिलांनी किमान एक महिनाआधी फॉलिक ऑसिडची गोळी सुरू करावी. तसेच गरोदर राहिल्यानंतरही तीन महिने ही गोळी घ्यावी. फॉलिक ऑसिडमुळे बाळांमध्ये न्युरल टय़ूबमध्ये होणारे संभाव्य धोके टाळण्यास मदत होते.
सकस आहार
सकस आणि समतोल आहारामध्ये पोषणयुक्त पाच प्रकारच्या अन्नपदार्थांचा समावेश असतो. भरड धान्ये आणि डाळी, भाज्या आणि कडधान्ये, सॅच्युरेडेट फॅट्सचे प्रमाण कमी असलेले मांस, मच्छी, अंडी, टोफू, बिया, नट्स आणि कडधान्ये फळे, दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॅट कमी असलेले दूध, चीज, योगर्ट, भरपूर पाणी पिणे हादेखील आरोग्यदायी आहाराचाच भाग असून महत्त्वाचे आहे. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण पुरेसे राहण्यासाठी विविध पदार्थांच्या माध्यमातून पाणी शरीरात घेता येऊ शकते. पाण्याचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ म्हणजे पाणी, दूध, ताज्या फळांचा रस, नारळाचे पाणी.
काय खाऊ नये?
घातक बॅक्टेरिया किंवा पॅरासाईटचा धोका टाळण्यासाठी तसा धोका असणारे पदार्थ टाळावेत. उदाहरणार्थ, अस्वच्छरीत्या किंवा अर्धवट शिजविलेले अन्न खाल्ल्यास शरीरात विषबाधा होण्याचा धोका असतो. तसेच यामुळे अतिसार, उलटय़ा होण्याची शक्यता असते. याचे गंभीर परिणाम बाळाच्या वाढीवर होण्याची शक्यता असते. अति प्रमाणात मर्क्युरीचा समावेश असलेले मासे खाणे शरीरासाठी घातक असते. गरोदरपणात कोणते मासे खावेत यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच डबाबंद पदार्थांचा वापर करताना वापराचा अंतिम दिनांक तपासून घ्यावा. पदार्थ योग्य रीतीने जतन केला आहे का, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. याबाबत कोणतीही शंका असल्यास असे पदार्थ टाळणेच उत्तम! गरोदरपणात धूम्रपान, अल्कोहोल आणि प्रक्रियायुक्त पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे.
(लेखिका नवी मुंबई येथील मेडिकव्हर रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ आणि सल्लागार आहेत)



























































