
मराठी रंगभूमीवरील काही गाजलेल्या बालनाटय़ांपैकी एक नाटक म्हणजे ‘अलबत्या गलबत्या’. अभिनेता वैभव मांगले यांनी आपल्या अभिनयाने आणि दमदार संवादाने हे नाटक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी साकारलेली चिंची चेटकीण तुफान गाजली. केवळ लहान मुलांचा नव्हे, तर मोठय़ांचाही या बालनाटय़ाला अप्रतिम प्रतिसाद मिळत होता. मात्र येत्या काळात वैभव मांगलेंनी साकारलेली चिंची चेटकीण प्रेक्षकांना पाहता येणार नाही. कारण वैभव मांगलेंनी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक सोडल्याचे जाहीर केले आहे. यामागे वैभव मांगलेंचे बिझी शेडय़ूल आणि तारखांचे गणित जुळत नसल्याचे कारण समजते.
वैभव मांगले यांनी ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक सोडल्यानंतर आता धम्माल चिंची चेटकिणीची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. वैभव मांगलेंच्या जागी आता अभिनेते नीलेश गोपनारायण चिंची चेटकीण साकारणार आहे. मांगले सध्या वेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. तारखांचे गणित जुळत नसल्याने नव्या कलाकारांसह नाटक करण्याचा निर्णय घेतला, असे निर्माता राहुल भंडारे यांनी सांगितले. ‘शे मस्ट गो ऑन’… आता नवी चिंची दाखवणार तुम्हाला जादुई दुनियेची कमाल, असेही भंडारे यांनी म्हटलेय.
नाराजी नाटय़
वैभव मांगले यांनी नाटक सोडल्याचे सांगत एक पोस्ट लिहिलीय. त्यात मांगले यांनी म्हटलंय, ‘प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो -मैत्रिणींनो, मी चिंची चेटकिणीचे काम सोडले आहे. तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पाहायला याल आणि भ्रमनिरास होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की, ती मी नाहीच.’
या पोस्टमागचे कारण सांगताना वैभव म्हणाले, माझ्याशी साधर्म्य असलेला फोटो नाटकाच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीवर छापला आहे. तसेच त्यावर कुठल्याही कलाकाराचे नाव नाही. जाहिरात बघून मला लोक विचारणा करू लागलेत की, तुमचं नाटक आहे. आमच्या इथे याल तेव्हा फोटो द्याल का? त्यामुळे मी समजून नाटक पाहायला गेलेल्या प्रेक्षकांचा भ्रमनिरास होऊ नये, असे मला वाटते. दुसरं म्हणजे आता मी नाटकात नाहीये, तर मग वेगळी चेटकीण साकारावी आणि तिचे नाव द्यावे. नवीन कलाकार घेतला तर तुम्ही त्याला प्रमोट केला पाहिजे. म्हणून हा पोस्ट प्रपंच.



























































