खाणं आणि बरंच काही – उपवासाला फशी दुप्पट खाशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आरती देवगावकर

आरोग्याच्या कारणाने उपयुक्त असलेल्या उपवासाला हल्ली मात्र ग्लॅमरस स्वरूप प्राप्त होत चालले आहे. ज्या दिवशी पोटाला विश्रांती द्यायची त्या दिवशी उलट नाना प्रकार करून खाल्ले जातात. फक्त खिचडी खाऊन पंटाळा येईल म्हणून आता उपवासाच्या दिवशी पुरी-भाजीपासून इडली-डोशापर्यंत पदार्थ खाल्ले आणि खिलवले जातात. हे बरे आहे का?

आता गणपती येतील असं म्हणता म्हणता गणपती-गौरी आले आणि पुन्हा स्वस्थानी गेलेही. आता पितृपक्ष. पितरांना जेवायला घालण्याचा मोठा कार्यक्रम घरोघरी होत असतो. ‘श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध’ असे म्हटले तरी त्याचे दडपण घेऊन रीत म्हणूनही खूप घरांमध्ये हे पार पाडले जाते. याचवेळी सगळीकडे अजून एक मोठी तयारी सुरू होते ती नवरात्राची! घराची साफसफाई हे महत्त्वाचे काम करतानाच गृहिणींची ‘उपवासाच्या पदार्थांचे काय?’ या प्रश्नाने झोप उडालेली असते. का बरं असं होत असेल? याला कारण आपल्या उपवासाची पद्धत.

नवरात्रात जवळ जवळ देशभरात विविध कुलाचार साजरे केले जातात आणि यात पहिल्या क्रमांकावर असतात उपवास. काही घरी पहिल्या आणि शेवटच्या म्हणजे नवमीच्या दिवशी उपास करतात तर काही ठिकाणी नऊ दिवस. ज्यांना ते होत नाहीत त्यांनी निदान अष्टमीच्या दिवशी तरी उपास धरावा असे म्हणतात. त्यामुळे तो एक मोठा उपवास असतो. नवरात्रीशिवाय अजूनही कितीतरी निरनिराळे उपास असतात. जेवढे उपवास तेवढय़ा त्याच्या खाण्याच्या नाना परीदेखील असतात.

हिंदुस्थानच्या गुजरात-राजस्थान भागात पाहिले तर जैनांचे वेगवेगळे उपास असतात. काही उपासक केवळ कडधान्य उकडून मीठ न घालता खातात, मीठ घालायचं झालं तर भाजून घालतात. काही वेळा ज्वारीची भाकरी नुसती ताकात कुस्करून, तर कधी दूध, दही, तूप, हिरव्या भाज्या, फळ यातलं काहीही न खाता उपवास. कधी एक आसनी उपास म्हणजे एका वेळी ताटावर बसल्यावर दिवसभरातले जे काही खायचे-प्यायचे असेल ते एकाच वेळी खाऊन घेणे, काही दोन वेळा जेवून असतात. उपवासाच्या दिवसांमध्ये सूर्यास्त ते सूर्योदय अजिबात पाणी पित नाहीत. संवत्सरीचा उपास हा निर्जळी केला जातो. या सगळ्यात महत्त्वाचं असतं ते उकळून गार केलेले पाणी प्यायचं. साधं पाणी प्यायलं, तर उपवास मोडला असं धरलं जातं.

उत्तर हिंदुस्थानात महाभारत काळापर्यंत ज्याचे धागेदोरे असलेले लोककथा सांगतात, त्या ‘करवा चौथ’ या उपवासाचे बरेच माहात्म्य आहे. हिंदी चित्रपटांमुळे हा सण आणि उपवास फारच लोकांपर्यंत पोहोचला आहे. पहाटे लवकर उठून खाऊन घेऊन मग सूर्योदयापासून चंद्र उगवेपर्यंत पाणीही न पिता हा करतात. चंद्रोदयानंतर त्याला पाणी अर्पण करून पाणी पिऊन आणि काहीतरी गोड खाऊन उपवास सोडला जातो.

दक्षिण हिंदुस्थानात, प्रामुख्याने उत्तर कर्नाटक भागात उपवासाला कांदा-लसूण न वापरलेले पदार्थ खाल्ले तरी चालतात. बंगलोर-म्हैसूरच्या बाजूला तांदळाचे पदार्थ चालत नाहीत. गहू, रव्याची इडली, खीर वगैरे बाकी काहीही चालते. बंगाली लोकांमध्ये निरनिराळ्या पूजांच्या वेळी निरनिराळ्या प्रकारचे ‘उपोश’ केले जातात. त्या प्रत्येकाचे आपापले वेगळे नियम असतात. त्यात काही निर्जळी असतात, तर काही फक्त पाणी पिऊन; पण काहीही न खाता करायचे असतात. पूजाअर्चा झाल्यावर नैवेद्य दाखवल्यावर खाल्ले तर चालते. एखादा मोठा उपवास असेल तेव्हा दलिया खिचडी, चुरमुऱयाचे पाणी घेतले जाते. सर्व पूजा आणि कुटुंबांचे आपापले रीतिरिवाज असतात त्याप्रमाणे त्यांचे पालन केले जाते. बऱयाचशा उपवासानंतर तिथे भात आणि मासे खाऊन उपवास सोडला जातो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केवळ शाकाहार घेतला जातो, तर कालीपूजा होते तेव्हा मटन खाल्ले जाते.

महाराष्ट्रातदेखील अनेकविध पद्धती दिसून येतात. उपवासाच्या पदार्थांच्या मोहाने उपवास करणारे कितीतरी लोकही असतात. नक्त (फक्त फराळाचे खाऊन), एकभुक्त (एकवेळ जेवण करून), फलाहार (फक्त फळे खाऊन) इ. मुस्लिमांचे रोजे, सिंधी लोकांचे चाळीस दिवसांचे झुलेलालसाठी केलेले उपवास याचा प्रकार साधारण सारखाच असतो. सूर्योदय ते सूर्यास्त काही खात नाहीत. अगदी पाणीही पित नाहीत. तब्येतीच्या कारणाने कुणी अगदीच जमत नसेल तर मग फळे खाऊन करतात.

खरे तर ‘उपवास’ या शब्दाची पह्ड उपवास अर्थात जवळ राहणे असा आहे. त्या दिवशी बाकी भौतिक गोष्टींमधा rल मन जरा बाजूला काढून परमेश्वराच्या सान्निध्यात बसावे, नामस्मरण करावे, स्वतःसाठी वेळ काढून काही मनन-चिंतन करावे असे अपेक्षित असते. मिताहार असावा असे अध्याहृत असते. हल्लीच्या खाण्याचे ताळतंत्र सुटलेल्या युगात पचनसंस्थेला जरा आराम पडावा म्हणून आपल्या पूर्वजांनी ही कल्पना काढली, त्याला धार्मिक अधिष्ठान दिले. समाजशास्त्र्ााच्या मते पूर्वीच्या काळी कधीतरी अन्नाचे दुर्भिक्ष आले असावे त्या वेळी ही संकल्पना पुढे आली असेल. काहीही असले तरी कमी खाणे किंवा न खाणे हे शास्त्र्ासंमत आहे खरे. आयुर्वेदातही लंघन करणे ही अतिशय चांगली गोष्ट समजली जाते. तो उपवासाचाच एक प्रकार आहे.

आरोग्याच्या कारणाने उपयुक्त असलेल्या उपवासाला हल्ली मात्र ग्लॅमरस स्वरूप प्राप्त होत चालले आहे. सगळीकडे असणारी ‘शो-बाजी’ यातही डोकावू लागली आहे. ज्या दिवशी पोटाला विश्रांती द्यायची त्या दिवशी उलट नाना प्रकार करून खाल्ले जातात, तेसुद्धा पचायला जड असणारे. एरवी कधी खाण्यात नसणारे पदार्थ त्या दिवशी आवर्जून केले जातात. मुळात हिंदुस्थानीच नसणाऱया साबुदाणा आणि बटाटे यांनी या आहारात बाजी मारली आहे. नकळत ते उपवासाचा अविभाज्य भाग कसा काय बनले हे गौडबंगालच आहे. फक्त खिचडी खाऊन पंटाळा येईल म्हणून आता उपवासाच्या दिवशी पुरी-भाजीपासून इडली-डोशापर्यंत पदार्थ खाल्ले आणि खिलवले जातात. किती विविध प्रकारचे पदार्थ केले जातात यावरून सुगरणीचा दर्जा ठरवला जातो. हे बरे आहे का? याचा विचार करण्याएवढे आपण नक्कीच सुज्ञ आहोत नाही का! तेव्हा येणाऱया नवरात्रात उपवास करा; पण आरोग्याची काळजी घेऊन. सर्वांना उपवास पर्वाच्या शुभेच्छा!
(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)
 [email protected]