
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
आज बरेचसे पालकही मुलांना शिस्त लावण्याच्या नादात मुलांच्या मनाचा जराही विचार न करता वाटेल तसं बोलतात. मग जर मुलं तसंच त्यांना आणि इतरांनाही त्याच पद्धतीने बोलायला शिकली तर यात दोष कोणाचा? मुलांचा गेलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्यासाठी, मनातली आईवडिलांबद्दलची अढी दूर होण्यासाठी तसेच मनातील नकारात्मकता घालवण्यासाठी मानसिक उपचार होणे आवश्यक आहे.
मॅडम, एकतर मला तरी मरू दे नाहीतर माझे आईवडील तरी मरू देत.’ दहावीत शिकणाऱया आर्याचे (नाव बदललेले आहे.) उद्वेगजनक बोलणे तिच्या उद्ध्वस्त मनःस्थितीची कल्पना करून देत होते. तिचा तिच्या आईवडिलांबद्दल असलेला संताप अश्रूंवाटे बाहेर पडत होता. आर्या तिच्या पालकांबरोबर समुपदेशनासाठी आली होती. त्या दोघांकडे बघण्याचेही टाळत होती. चुकून जर नजर गेलीच तर खाऊ की गिळू नजरेने पाहत होती.
आर्या ही तिच्या आईवडिलांची अत्यंत लाडाकोडात वाढलेली, स्वभावाने भिडस्त अशी एकुलती एक मुलगी होती. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत सुखवस्तू अशी होती. तिच्या घरी तिचे आजी-आजोबा, दोन काका आणि त्यांचे कुटुंब अशी मंडळी एकाच ठिकाणी राहायला होती, पण सगळय़ांचे स्वतःचे असे स्वतंत्र बिऱहाड होते. आपापसातील मतभेद हे त्यामागील कारण होते. पण तरीही ही सर्व जण सण-समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम एकत्रितपणे साजरे करत.
‘या आमच्या आपापसातील भांडणांमुळे आमची सर्वांची मुलंही आपापसात भांडत असतात. एकमेकांची खिल्ली उडवत असतात आणि याचा सगळय़ात जास्त परिणाम आमच्या आर्यावर झालाय. तिला तिची चुलत भावंडं कधीच खेळायला घेत नाहीत. त्यांच्यात सामील करून घेत नाहीत. तिच्या लहानपणापासून असलेल्या घाबरट स्वभावाची कायम खिल्ली उडवत राहतात. त्यामुळे ती त्यांच्यामध्ये सामील न होता घरातच राहायला लागली आणि बिघडली.’ तिच्या आईने एका झटक्यात हे सर्व सांगितले.
आर्या केबिनबाहेर कसलेसे चित्र काढत बसली होती. आत तिचे आई-वडील तिच्या आणि त्यांच्या ताणलेल्या संबंधांबाबत सांगत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार; आर्याला कायम तिच्या भावंडांनी एकटं पाडल्यामुळे ती घरातच राहायची. मग आईवडिलांनी तिला लहानपणापासूनच भरपूर खेळणी, सतत बाहेर जाणं, खाणं-पिणं हे सुरू केलं. जसजशी ती मोठी होत होती तसतशी बाहेर मैत्रिणींसोबत फिरायला जाणं, हवी तशी खरेदी करणं हेही चालू केलं. त्यासाठी ती म्हणेल तेवढे पैसे तिच्या हातात टेकवू लागले. कुठलाही हिशोब न मागता.
आर्याचं चित्र एव्हाना काढून झालं होतं आणि तिच्या आईवडिलांकडूनही आवश्यक ती माहिती मिळाली होती. जशी आर्या आत केबिनमध्ये आली तेव्हा तिने आल्याबरोबर त्यांना सांगितले, ‘बाहेर जा. नाहीतरी भरपूर बिचारे बनून बोलला असाल या मॅडमशी.’ तिचा चढलेला पारा पाहून ते दोघेही निमूट बाहेर पडले. जशी ती दोघं बाहेर गेली तशी आर्या लगेच शांत झाली आणि निमूटपणे खाली मान घालून समोर बसली. एक-दोन क्षण शांततेत गेले. तिने तिचे चित्र दाखवले – एका मुलीचे चित्र होते ते. जिच्या गळय़ाभोवती दोरी बांधली होती आणि ती मुलगी तरंगत होती.
आर्या नैराश्यात होती हे तिच्या बोलण्यातून जाणवत होतेच, पण चित्रातून तिच्या मनातले आत्महत्येचे विचार स्पष्ट दिसत होते. तिला बोलती करणे अत्यंत गरजेचे होते आणि आव्हानात्मकही. कारण आर्याचा आता कोणावरही विश्वास राहिला नव्हता. तिच्या मनात सतत आयुष्य संपवण्याचे विचार येत होते. ‘मला नाही जगायचे आहे. मला स्वतःची घाण वाटायला लागली आहे. असं वाटतं, मरून पुन्हा नव्याने दुसरे आईबाबा यावेत.’
तिच्या डोळय़ातले अश्रू थांबत नव्हते. आर्या अशक्तही वाटत होती. ‘मला नाही भूक लागत. रात्रभर जागी असते. पहाटे झोप लागते, पण शाळेत जायचं असतं. आता तर तिथेही जावंसं वाटत नाही. लाज वाटते मला इतर मुलांबरोबर मिसळायला, पण आईचं तोंड बघायला नको म्हणून मी शाळेत जाते आणि शाळा सुटल्यावर खूप वेळाने घरी येते.’
‘इतका राग का?’ असं विचारताच आर्या पटकन म्हणाली, ‘आईला माझ्या चारित्र्यावर संशय आहे. ती मला नेहमी नको त्या घाण शिव्या घालूनच बोलते. तिला मी शाळेतल्या मुलांशी बोललेलं आवडत नाही. माझे बाबा तर दुसरं टोक. त्यांना कायम मी पूर्ण अंग झाकणारे कपडे घालावे असं वाटतं. मी काय असे कपडे घालू का? जर फॅशनेबल कपडे घातले की तेही मग असंच मला घाणेरडं बोलतात. इतकी हर्ट होते मी. माझ्या वर्गातल्या मुलांचे आईवडील किती चांगले आहेत आणि ओपन माइन्डेडही.’
आर्या खरंच बोलत होती. तिच्या आईवडिलांवर बुरसट विचारसरणीचा पगडा होता. त्यामुळे आर्याचे असे मोकळेपणाने वागणे त्यांना मान्य नव्हते. आर्याही आता बंडखोर झाली होती. स्वतःला खोलीत बंद करून घेत होती. या सगळय़ामध्ये तिचा अभ्यास बाजूला पडला होता. तिला पुस्तकांतही तिचे आई-वडील दिसायचे. त्यांचं विचित्र बोलणं आठवायचं. मग ती चिडून अभ्यासच करेनाशी झाली.
तिचे तसेच तिच्या पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे होते. आर्याचे नैराश्य तसेच आत्महत्येचे विचार दूर करण्यासाठी मानसोपचार सुरू झाले होते.
‘घरात शिव्या वगैरे दिल्या जातात का?’ हा प्रश्न तिच्या पालकांना विचारल्यावर तिचे वडील लगेच म्हणाले, ‘आमची हीच रागीट आहे आणि रागात तिचा ताबा सुटतो.’ आर्याच्या आईने नजरानजर टाळली. ‘मुलीने तिच्या वयाला साजेल असे कपडे घातले तर ती वाया गेली आणि मुलांना आकर्षित करते असा अर्थ होतो का?’ हे विचारताच तिचे वडील लगेच म्हणाले, ‘अहो मी बाबा आहे तिचा. तिला समज द्यायला नको का?’
आर्याच्या पालकांची तिच्याशी बोलण्याची आणि वागण्याची पद्धत चुकत होती. नाही का? आज बरेचसे पालकही मुलांना शिस्त लावण्याच्या नादात मुलांच्या मनाचा जराही विचार न करता वाटेल तसं बोलतात. मग जर मुलं तसंच त्यांना आणि इतरांनाही त्याच पद्धतीने बोलायला शिकली तर यात दोष कोणाचा?
आर्याच्या पालकांना ही सगळी समज कठोर शब्दांत द्यावी लागली. कारण त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. तिच्या आईवरही रागाकरिता मानसोपचार सुरू करण्यात आले. त्याचवेळेस आर्या वेळोवेळी समुपदेशनासाठी येत होतीच. तिचा गेलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्यासाठी, तिच्या मनातली आईवडिलांबद्दलची अढी दूर होण्यासाठी तसेच तिच्या मनातील नकारात्मकता घालवण्यासाठी सत्रे सुरू झाली.
आज, या घडीला आर्यामध्ये आणि तिच्या पालकांमध्ये थोडाफार फरक दिसतोय. आर्याचे आत्महत्येचे विचार पूर्णपणे नाहीसे झालेत, मात्र आईवडिलांबद्दल थोडी नाराजी आहेच. दुसऱया बाजूला तिचे पालक हळूहळू काही गोष्टी समजून घेत आहेत. काही गोष्टींवर काम करत आहेत.
ही आर्याची केस काही दिवसांत एका चांगल्या रिझल्टवर बंद होईल यात शंका नाही.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]






























































