
नऱ्हेतील हरीहरेश्वर पार्क सोसायटीच्या तळमजल्यावर पार्क केलेल्या वाहनांना आग लावण्यात आल्याचे उघड झाले असून याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एकाला अटक केली. तर, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. सोसायटीच्या आवारात आणलेल्या आर्केस्ट्रा तसेच वर्गणीच्या कारणातून एका व्यक्तीसोबत झालेल्या वादातून दोघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
विशाल श्रीमंत मिसाळ (वय – 19) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत त्याच सोसायटीतील ३39 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. यात चार दुचाकी आणि दोन कार अशा एकूण सहा वाहनांचे नुकसान झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी मिसाळ एकाच सोसायटीत राहण्यास आहेत. आरोपी मिसाळ आणि त्याच्या साथीदाराचा गेल्या वर्षी ऑर्केस्ट्राच्या कारणातून फिर्यादीसोबत वाद झाला होता. त्यावेळी दोघांनी फिर्यादीना शिवीगाळ करत पाहून घेण्याची धमकी दिली होती. तसेच, नुकतेच सोसायटीच्या गणपतीची दोनशे रुपये वर्गणी असताना देखील आरोपींनी प्रत्येक सभासदाकडून इच्छा नसताना एक हजार रुपये वर्गणी घेतली होती. यावर देखील फिर्यादीने आक्षेप घेतला होता. या सर्व रागातून आरोपी मिसाळ याने शुक्रवारी मध्यरात्री पार्किंगमध्ये लावलेल्या फिर्यादीच्या दुचाकीला आग लावली. मात्र, झालेल्या भडक्यामुळे तेथील इतर वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेत सहा वाहनांचे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर पोलिसांना ही आग लागली नसून, कोणीतरी लावल्याचा संशय होता. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी तपास सुरू केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यावेळी लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला मिसाळ कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांना दिसले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सुरूवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानुसार त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
”वाहनांना आग लावणाऱ्याला अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. सोसायटीत दोघांमध्ये झालेल्या वादातून आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.”
– शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे

























































