फर्स्ट टेक – टायमिंगचा बादशहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>स्वरा सावंत

शाळेत अभिनयाचा अ काय असतो याची जाण नसलेला हा पठ्ठय़ा कोकणचा, कोहिनूर कॉलेजच्या दुनियादारीत येतो, कल्चरल ऍक्टिव्हिटीने प्रभावित होतो आणि आपली टीम तयार करून स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी कॉलेज प्रशासनाला भाग पाडतो… इथूनच सुरू होतो त्याचा अभिनय प्रवास. खिलाडू वृत्तीने प्रत्येक काम करताना येणाऱया आव्हानांचा सामना कसा करायचा, सांगतोय अचूक टायमिंगचा बादशहा कॉमेडी किंग ओंकार भोजने.

 मी मूळचा चिपळूणचा… अभ्यास आवडत होता, पण कधी खेळाव्यतिरिक्त इतर ऍक्टिव्हिटीचा विचारही केला नाही. नंतर डीबीजे कॉलेजमध्ये आल्यावर अभिनयाच्या या पैलूशी गाठ पडली. व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेटची प्रॅक्टिस करताना जिमखान्यात कल्चरल ग्रुपच्या काही मुलांशी ओळख झाली. त्यांची प्रॅक्टिस बघून मला हे जमेल असं वाटू लागलं. त्यादरम्यान आमचं कॉलेज कोणत्याही प्रकारच्या स्पर्धांमध्ये उतरत नव्हते. कारण तसा ग्रुपही नव्हता. शेवटी मग आम्ही एकत्र येत नाटकाचा ग्रुप तयार केला. पुरुषोत्तम करंडक, आईनटीसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कॉलेज प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू करू लागलो. अभिनयाचे कौशल्य सगळं नंतर, पण किमान हे विद्यार्थी  काही करू शकतात असा विश्वास मिळणं गरजेचं होतं. तो विश्वास कॉलेजने दाखवला आणि आमची अभिनय एक्स्प्रेस मार्गी लागली.

पुढे अभिनयाची ओढ काही शांत बसू देत नव्हती. विविध नाटकं, प्रयोगांच्या माध्यमातून स्वतःला पॉलिश करत होतो. वाचनाची खूप आवड, खिलाडू वृत्ती, स्वतःवरचा विश्वास आणि मित्रपरिवाराचा पाठिंबा या प्रवासात खूप कामी आला. कॅमेरा फेस करण्याची वेळ कॉमेडी स्कीट्सच्या निमित्ताने भीती अजिबात नव्हती, पण हे टेक्निक शिकण्याचे कुतूहल कायम होते.

कॉमेडीची जीएसटी एक्स्प्रेस, तुमच्यासाठी काहीपण, महाराष्ट्राची हास्यजत्रा असे काम सुरू झाले. स्वतःसाठी चाचपून बघताना अभिनयाचा हा प्रयोग शिकण्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. यानंतर आलेले बॉईज 2, बॉईज 3, घे डबल, रूप नगर के चित्ते हे सिनेमे म्हणजे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

मित्र खूप सांभाळतात

स्पर्धांच्या निमित्ताने भेटलेले मित्र, कॉलेजच्या दुनियादारीत जमलेला गोतावळा आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरलाय. तेव्हापासून ते आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी मला मित्रांची मोलाची साथ मिळाली. कधी कुठल्याही कामासाठी येताना आजही मुंबईत मी माझ्या मित्रांकडे उतरतो. नुकत्याच आलेल्या माझ्या दोन सिनेमांच्या क्रिनिंगसाठी चिपळुणात मित्रांनी विशेष निवेदन देत सिनेमा लावायला प्रशासनाला भाग पाडले. इतकं मित्र आजही सांभाळतात… आणखी काय हवं!

सगळय़ात भारी नाही, तर वेगळं व्हा!

या क्षेत्रात सांगणारे कमी आणि बोट दाखवणारे जास्त आहेत. म्हणून नवीन मुलांनो आपली स्वतःची शैली डेव्हलप करा. सगळय़ात भारी नाही तर वेगळं व्हा! क्यों की जो अलग है, वो बिकता है… और गर्दी में दिखता है। आपण वेगळे आहोत हेच महत्त्वाचे आहे त्याची कॉपी नाही आणि दुसरा होणे नाही.

आईबाबा कायम सोबत

या प्रवासात घरच्यांचा पूर्ण पाठिंबा आजवर राहिला आहे. यामुळे काही नवीन करताना दडपण राहत नाही. डिग्रीनंतर मुलगा काही कमवून देईल अशी अपेक्षा माझ्या बाबांनी कधीच केली नाही. आजही तेच मला कायम सांभाळून घेतात. मला या क्षेत्रात तंत्रशुद्ध शिक्षण घ्यायचे होते. स्पर्धांमुळे ते राहून गेलं, पण आजही मी तयारी केली तर आई-बाबा कायम पाठीशी असतील याची पूर्ण खात्री आहे.