इजिप्तमध्ये आढळले 3300 वर्षं जुने गुलाबी थडगे! उलगडणार अनेक रहस्ये?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इजिप्तची राजधानी कैरो येथे हजारो वर्षांपूर्वीचं एक थडगं सापडलं आहे. मृतदेहांना दफन करण्याच्या एका प्राचीन कक्षात हे थडगं पुरातत्व विभागाला आढळलं आहे. या थडग्यासाठी वापरलेला दगड हा गुलाबी रंगाचा ग्रेनाईट असल्याने त्याला संशोधकांनी गुलाबी थडगे असं नाव दिलं आहे.

हे थडगं पटाह एम विया याचं असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पटाह हा इजिप्तचा राजा रामेसेस द ग्रेट याचा खजिनदार होता. या थडग्याच्या सभोवती अनेकविध प्रकारी चिन्हं, प्रतीकं, चित्रलिपी आणि नावं कोरण्यात आली आहेत. हे थडगं सुमारे 3300 वर्षांपूर्वीचं आहे. या थडग्याचा शोध जमिनीच्या 23 फूट खाली मूळ रुपात लागला आहे.

या थडग्याला शोधणाऱ्या प्राध्यापिका ओला एल अगुइजिन यांच्या म्हणण्यानुसार, या शोधाच्या माध्यमातून तुतनखामेन या राजानंतर इजिप्तवर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांविषयी खूपशी माहिती शोधता येईल. या थडग्यावरील लिपीवरून हे स्पष्ट होत आहे की, हे थडगं पटाह एम वियाचंच आहे. ते त्याकाळचे अर्थमंत्री होते. ते राजाच्या निकटवर्तीयांपैकी एक होते आणि तेव्हाच्या शासनकाळात त्यांचं महत्त्वाचं स्थान होतं.

हे थडगं बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. फक्त थडग्याच्या झाकणाचा भाग तुटला होता. उर्वरित थडग्यावरून त्यांना अभ्यास करता येणार आहे. त्याच्या थडग्याच्या अभ्यास करून पटाह एम विया याच्या आयुष्याविषयी अधिक खुलासे होऊ शकतील, असा विश्वास ओला यांनी व्यक्त केला आहे.