
>>स्वरा सावंत
चित्रकार असल्याने कलेचा बाज हा होताच, पण अभिनय क्षेत्राविषयी खात्री नव्हती. पहिलं काम मिळालं ते ऑडिशनशिवायच… वाटलं सोप्पा आहे हा रस्ता. पण दिसतं तस नसतं. खरा स्ट्रगल काय असतो ते यानंतरच कळलं. ऑडिशनला येताना दिवसभराचं मुंबई–पुणे ट्रव्हल, मेकअप नाही, कुणाची ओळख नाही. तरीही अनेक मालिका लीड करून आपलं अस्तित्व निर्माण केलं. आतापर्यंत केलेल्या खडतर प्रवासाबाबत सांगतेय अभिनेत्री सायली देवधर.
चित्रकलेत रस असल्याने अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेतला, पण इथे अनेक जण खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत शिकत होते. आपण जरा पह्टोजेनिक दिसतो हे इथल्या पह्टोग्राफर मित्राकडून कळलं. त्यामुळे कॉलेजमध्ये मीच यांची मॉडेल होते. हौसेखातर काढलेले पह्टो एका मित्राने ‘लग्न पाहावे करून’ टीमला पाठवले आणि मला ऑडिशनचा कॉल आला. अभिनय काय असतो माहीत नाही, ऑडिशन कधी पाहिली नाही, बरं तिकडे पोहचायचे कसे हेही माहीत नव्हते. मित्रांनी तो आत्मविश्वास दिला आणि मी ऑडिशन न देताच माझं कास्टिंग झालं. पण म्हणतात ना, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…
यानंतर सुरू झाला खरा स्ट्रगल टाइम. सिनेमाच्या सेटवर पोहचले खरी, पण सीनिअरसमोर तोंडातून ब्र फुटेना. कधी पॅमेरा पाहिला नाही. टेक्निक माहीत नाही आणि मी अभिनय करायला गेले. खूप प्रेशर घेऊन मी गोंधळात पडले. शेवटी अन्य कलाकारांनी वातावरण हलपं करत मला कॉन्फिडन्स दिला… आणि हे काम मार्गी लागले, पण पुढे काय, हा प्रश्न होताच. पुढे ऑडिशनचा मुंबई-पुणे दौरा सुरूच होता. सकाळी लवकर पुण्यातून निघायचे ऑडिशन झाली की परतीचा प्रवास सुरू व्हायचा. आई घरून डबा द्यायची. कधी, कुठल्या नातेवाईकांकडे मी राहिली नाही. खरं तर प्रवासात मी घडत गेले. घरच्यांना प्रश्न पडायचा, हिला काम मिळणार आहे का? पण मी हार मानली नाही. एकदा तर ऑडिशन देऊन मी निघाले रात्री. स्वारगेटला उतरताना मला माझी निवड झाली आणि सकाळी शूट आहे असं कळलं. घरी गेले आणि रात्रीच्या रात्री निघाले. या क्षेत्रात असं बऱयाचदा होतं. पण नाही म्हणता येत नाही, कारण लगेच पर्याय उपलब्ध होतो.
50 हजारांच्या नोकरीला रामराम
मी कमर्शिअल आर्टस्ची विद्यार्थिनी. अभिनव कला महाविद्यालयातून शेवटच्या वर्षाला हिंदुस्थानातून मी पहिली आले. यानंतर लगेचच 50 हजारांची नोकरी चालून आली. पण अभिनयाचा चस्का लागल्याने मी या नोकरीला रामराम केला. घरच्यांना खरं तर हा धक्का होता. कारण करीअरच्या सुरुवातीला असा निर्णय घेणं धाडस होतं. पण केलं मी हे धाडस.
ट्रेनमध्येच केला मेकअप
एका हिंदी प्रोजेक्टसाठी ऑडिशन द्यायला मी आणि माझी बहीण ‘डेक्कन क्वीन’ने निघालो. रोजच्या प्रवाशांनी जागा असूनही आम्हाला बसू दिले नाही आणि चक्क मधल्या पॅसेजमध्ये उभं राहून प्रवास केला. मोजून पैसे हातात. त्यामुळे तयारी करायला जाणार कुठे. म्हणून मग टॉयलेट मिररमध्ये कसाबसा मेकअप केला. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांनी मला न्याहाळत विचारले की, आप ऑडिशन के लिये आये हो. तेव्हा मला कळलं की इथे तुमची बॅकस्टोरी नाही, तर दिसणं महत्त्वाचे आहे.



























































