
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना तातडीने सुरू करावी. तसेच बांधकाम कामगारांना येत्या दिवाळीला 20 हजार रुपये बोनस द्या. आदी प्रमुख मागण्यांसाठी आज लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, येत्या आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. भरमा कांबळे म्हणाले, महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 14 हजार कोटी रुपये शिल्लक असताना गेल्यावर्षी पाच हजार रुपये दिवाळी बोनसची शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षीचे दहा हजार व यावर्षीचे दहा हजार अशी एकूण वीस हजार रुपयांच्या बोनसची मागणी संघटनेच्या वतीने या सरकारकडे करण्यात आली आहे. आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा कांबळे यांनी दिला आहे.
बांधकाम कामगारांना दिवाळीला वीस हजार रुपये बोनस द्यावा. आरोग्य तपासणीच्या नावाखाली नोंदीत बांधकाम कामगारांची तपासणी करून रिपोर्ट न देणाऱया कंपनीचा ठेका रद्द करावा.बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना सुरू करावी. मेडिक्लेम योजना सुरू होणार नाही तोपर्यंत महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये न होणाऱया उपचारासाठी मंडळाकडून खर्चाचा परतावा देण्यात यावा. घरबांधणीसाठी साडेपाच लाख रुपये अनुदान द्यावे. यासाठी अटी कमी करून घरकुलचे अर्ज तातडीने मंजूर करावेत. 18 ते 60 वयोगटातील कामगारांना नैसर्गिक मृत्यूनंतर पाच लाख रुपये व अपघाती मृत्यूनंतर दहा लाख रुपये द्यावे. निवृत्तीचे वय 60 ऐवजी 65 करावे, पाच हजार रुपये पेन्शन द्यावी. बोगस बांधकाम कामगार नोंदणीला आळा घालावा व क्षमतेपेक्षा जादा दाखले देणाऱया इंजिनीअरवर कारवाई करावी, एजंटांचा सुळसुळाट थांबवावा, नोंदणीकृत कामगार संघटनेला प्राधान्य द्यावे, कामगारांना स्मार्ट कार्ड द्यावे, आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातून हा मोर्चा काढण्यात आल्याने काहीकाळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती.































































