
पूर्वी दाखल केलेली अॅट्रॉसिटीची फिर्याद परत घेण्याच्या कारणावरून उदगीर तालुक्यातील मौजे मलकापूर येथे मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मौजे मलकापूर येथील हणमंत मोहन गायकवाड यांनी उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, गावातील विशाल पवार आणि गोविंद पवार यांनी फिर्यादीस विशाल पाटील यांच्या शेतातील पार्टीला जेवण करण्यासाठी बोलावले होते. जेवण करण्यापूर्वी त्यांनी दारू पिण्याचा आग्रह केला. जेवण करत असताना दोघांनीही ‘तू आमच्यावर दाखल केलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे का घेत नाहीस?’ म्हणून शिवीगाळ केली.
जातीवाचक शिवीगाळ करून दगडाने, पाठीत दगडाने मारून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमान्वये तसेच भारतीय दंड संहिता चे कलम 294, 307, 326, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































