
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दोन वेळा राजीनामा देऊनही पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक राजीनामा स्वीकारला नसल्याचे सांगत आज शिवसेनेने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा समाचार घेतला.
पालिकेच्या नियमानुसार राजीनामा मंजूर करणे शक्य असताना केवळ ‘गद्दार’ शिंदे गटाच्या दबावामुळेच पालिका आयुक्त राजीनामा स्वीकारत नसल्याचे माजी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे, मात्र ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिकेने अद्याप मंजूर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱयांनी आज पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली. ऋतुजा लटके यांनी नियमाप्रमाणे राजीनामा दिलेला असतानाही तो का मंजूर केला नाही असा जाब शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विचारला. यावेळी माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर, शेखर वायंगणकर आदी उपस्थित होते.
नियम काय सांगतो
- राजीनामा देताना कायम हंगामी कर्मचाऱयांनी राजीनाम्याची एक महिना अगोदर नोटीस देणे आवश्यक आहे. नोकरीचा राजीनामा द्यावयाचा असेल तर राजीनाम्याची नमूद केलेली तारीख अमलात यावयाच्या कमीत कमी एक महिना अगोदर त्याने लेखी सूचना पत्र (नोटीस) देणे आवश्यक आहे.
- त्याप्रमाणे त्याने सूचना पत्र दिले नसेल तर त्याने राजीनामा स्वीकृतीच्या वेळी तो ज्या पदाचा राजीनामा देत आहे त्या पदाच्या एक महिन्याच्या वेतनाएवढी रक्कम महानगरपालिकेच्या कोषागरात भरली पाहिजे. राजीनामा स्वीकारल्याचे लेखी स्वरूपात कळवेपर्यंत संबंधितांची पालिकेची नोकरी चालू राहील. राजीनामा मंजूर केल्यानंतर कर्मचाऱयाला राजीनामा मागे घेण्याचा पर्याय दिला जाणार नाही.
- राजीनाम्याचे सूचना पत्र प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत जर योग्य प्राधिकाऱयाकडून स्वीकृतीचे किंवा अस्वीकृतीचे सूचना पत्र दिले गेले नाही तर राजीनामा स्वीकारला आहे असे समजण्यात येते.


























































