सामना अग्रलेख – जयप्रकाश असते तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी स्वातंत्र्य चळवळीने जी उदारमतवादी जीवनमूल्ये प्रमाण मानली व ज्या मूल्यांसाठी स्वातंत्र्य मिळवले, त्यावरच आघात करणारी शक्ती इंदिरा गांधींच्या रूपाने प्रबळ झाल्यावर जयप्रकाश त्या शक्तीविरुद्ध उभे राहिले आणि म्हणून एकाधिकारशाहीविरोधी लढय़ास नैतिक पातळी प्राप्त झाली. आज इंदिरा गांधींची राजवट बरी असे वाटावे इतके अधःपतन सुरू आहे. जयप्रकाश नारायण आता असते तर त्यांनी आणखी एका स्वातंत्र्याचा लढा निर्माण केला असता.

लोकनायक जयप्रकाश नारायण यांची विचारधारा व विचारवारसा यावरून देशात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. निमित्त झाले अमित शहा यांच्या एका वक्तव्याचे. गृहमंत्री अमित शहा यांनी 11 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सारण जिल्हय़ातील लोलटोला सीताबदियारा या गावी भेट दिली. ‘जेपीं’च्या 120 व्या जयंतीनिमित्त भव्य प्रतिमेचे अनावरण केले. त्या सोहळ्यात गृहमंत्र्यांनी नितीश कुमार, लालू यादव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘जयप्रकाश नारायण यांच्या अनुयायांनी सत्तेसाठी आपल्या विचारांचे बलिदान दिले आणि आता ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.’ अमित शहा यांचा हा हल्ला सरळ सरळ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर होता. नितीश कुमारांनीही मग त्यावर सांगितले की, ‘अमित शहांचे विधान दखलपात्र नाही. ज्यांचे राजकीय आयुष्य वीस वर्षांचेही नाही त्यांना जयप्रकाश काय समजणार?’ लालूपुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही अमित शहा यांना सडेतोड उत्तर दिले. तेजस्वी यांच्यानुसार शहा जे बोलले ते निरर्थक आहे. ‘भाजपचे जयप्रकाश नारायण यांच्या विचारांशी काही देणेघेणे नाही. देशात मोदी सरकारकडून लागू असलेल्या अघोषित आणीबाणीबाबत अमित शहा यांनी बोलायला हवे होते. जयप्रकाश नारायण हे देशांतर्गत हुकूमशाहीविरुद्ध लढले. लोकशाही रक्षणासाठी त्यांनी लढा दिला. आज देशात लोकशाहीच्या नावावर हुकूमशाहीच दिसत आहे. अमित शहा सध्याच्या हुकूमशाहीवर का बोलले नाहीत?’ असा सवाल तेजस्वी यादव यांनी विचारला, तो योग्य आहे. देशातील सर्व घटनात्मक संस्थांची मोडतोड आणीबाणीच्या कालखंडात झाली. आपल्या राजकीय विरोधकांना इंदिरा गांधी यांनी ‘मिसा’सारख्या कायद्याखाली अटक करून तुरुंगात डांबले. त्यात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, चंद्रशेखर, सरसंघचालक देवरस आणि स्वतः जयप्रकाश नारायण यांचा समावेश होता. विरोधकांची सरळ सरळ मुस्कटदाबी सुरू होती व त्याविरोधात जयप्रकाश नारायण यांनी दुसऱ्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. त्या लढय़ात लालुप्रसाद यादव, नितीश कुमारसुद्धा होते. त्यांनी तुरुंगवास भोगला. अमित शहा म्हणतात, ‘जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसची धोरणे आणि इंदिरा गांधी यांच्या

हुकूमशाहीविरोधात

आंदोलन केले होते. पण त्यांचे अनुयायी आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले.’ इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणी विरोधात जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या लढय़ाची आठवण तुम्ही करून देता, पण सध्याचे भाजप शासन तर आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करीत आहे व या आणीबाणीविरुद्ध आज विरोधी पक्षांतील काँग्रेस व इतर विरोधक लढा देत आहेत. त्यामुळे जयप्रकाश नारायण यांच्या विचारांना कोणी तिलांजली दिली व कोण कोणाच्या मांडीवर बसले हा वाद निरर्थक आहे. इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाही कारभाराविरोधात जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणले व जनता पक्षाची स्थापना केली. सर्व विरोधकांनी आपले विचार, चिन्ह, अहंकार गुंडाळून ठेवले व जयप्रकाश यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इंदिरा गांधींविरोधात विजय प्राप्त केला. 1977 साली जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर आपण दुसरे स्वातंत्र्य आणल्याचे जनता पक्षाने जाहीर केले आणि जयप्रकाशजींना दुसरे महात्मा गांधी बनवून राष्ट्रपित्याचे स्थान दिले, पण हुकूमशाहीविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांत ऐक्य राहिले नाही व जयप्रकाशजींच्या क्रांतीचा त्यांच्या हयातीतच चक्काचूर झाला. अमित शहा यांना जयप्रकाश नारायण किती कळले? असा प्रश्न नितीश कुमारांनी विचारला. जयप्रकाश नारायण भाजपला कळणे तसे कठीणच, पण देशातील विरोधकांना तरी जयप्रकाश लवकरात लवकर कळले तर बरे होईल. जयप्रकाश नारायण म्हणजे एक सात्त्विक, सत्त्वशील व नैतिक शक्ती होती. जयप्रकाश यांचे मोठेपण व वैशिष्टय़ हे की, त्यांनी समाजाच्या केवळ एकाच थरामध्ये आपल्यासाठी स्थान निर्माण केले नव्हते, तर सर्व थरांमध्ये त्यांना आदराचे स्थान होते. शिवाय त्यांचे लोकनायकत्व वा नेतृत्व सत्ता वा संपत्तीबरोबर येणारे व हे दोन्ही जाताच जाणारे असे नव्हते. किंबहुना, सत्तेपासून दूर राहूनच जयप्रकाश यांनी देशाचे नेतृत्व केले आणि मस्तवाल, उन्मत्त सत्ताधाऱ्यांनाही नमविले. हिंदुस्थानी स्वातंत्र्य चळवळीने जी उदारमतवादी जीवनमूल्ये प्रमाण मानली व ज्या मूल्यांसाठी स्वातंत्र्य मिळवले, त्यावरच आघात करणारी शक्ती इंदिरा गांधींच्या रूपाने प्रबळ झाल्यावर जयप्रकाश त्या शक्तीविरुद्ध उभे राहिले आणि म्हणून एकाधिकारशाहीविरोधी लढय़ास नैतिक पातळी प्राप्त झाली. आज इंदिरा गांधींची राजवट बरी असे वाटावे

इतके अधःपतन

सुरू आहे. जयप्रकाश नारायण आता असते तर त्यांनी आणखी एका स्वातंत्र्याचा लढा निर्माण केला असता. जयप्रकाश नारायण हे मूळचे काँग्रेसीच होते. काँग्रेसमध्ये त्यांनी समाजवादी गटाची स्थापना केल्यामुळे पक्षातील वजनदार गट त्यांच्यावर नाराज होता. तथापि गांधी व पं. नेहरू या दोघांनाही जयप्रकाश यांच्याबद्दल ममत्व होते, पण जयप्रकाश यांनी काँग्रेस पक्षातही कधी वैचारिक तडजोड केली नाही. त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रत्यय 1942च्या आंदोलन काळात आला. ही चळवळ तीक्र व प्रसंगी हिंसकही बनविण्यामागे त्यांची प्रेरणा होती. ‘करा व मरा’ हा गांधींचा संदेश खरा करून दाखविण्याचे क्रत जयप्रकाश यांनी घेतले होते. त्यामुळे देशभरात भूमिगत चळवळीचा जोर वाढला. हजारीबाग तुरुंगात जयप्रकाश यांना इंग्रजांनी प्रचंड यातना दिल्या. त्यांनी तेथून पलायन केले. तो सर्वच प्रकार रोमहर्षक, परंतु या रोमहर्षक कामगिरीचे जयप्रकाश यांनी कधीच भांडवल केले नाही. अत्यंत गरिबीत जन्मलेल्या व शिक्षणासाठी काबाडकष्ट घेतलेल्या आपल्या जीवनाचेही त्यांनी भांडवल केले नाही. आपली जात, धर्म यांचा कधी उल्लेख केला नाही. पंडित नेहरूंचे खरे वारसदार जयप्रकाश नारायणच होते, पण त्यांनी सत्तेसाठी तडजोड न करता स्वातंत्र्यानंतरही देशसेवेलाच प्राधान्य दिले. इंदिरा गांधी व त्यांचे लोक देशाला एकाधिकारशाही, हुकूमशाहीच्या दिशेने नेत आहेत हे पाहताच लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिराजींविरोधात रणशिंग फुंकले व त्यांचा पराभव घडवून आणला. या धगधगत्या कालखंडाचा अभ्यास अमित शहा यांनी करायला हवा होता व मगच जयप्रकाश नारायण यांच्या विचारांवर बोलायला हवे होते. जयप्रकाश यांनी देशात अन्याय, हुकूमशाहीच्या विरोधात संपूर्ण क्रांतीची हाक दिली. जनतेने ती हाक ऐकली. आज क्रांतीची भाषा करणाऱ्या राजकीय विरोधकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात ढकलले जात आहे. त्याच हुकूमशाही हातांनी जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेचे अनावरण करावे ही लोकशाही व स्वातंत्र्याची शोकांतिकाच म्हणायला हवी. शालेय पुस्तकांत अनेक धडे सध्या घुसवले जातात. ‘जयप्रकाश नारायण यांचा हुकूमशाहीविरुद्ध लढा’ हा धडाही नव्या पिढीसाठी शालेय पुस्तकांत घाला. अमित शहा यांनी त्या कामी पुढाकार घ्यावा ही विनंती!