संगमेश्वर करंबेळे येथे एस.टी बस-इर्टिगाचा अपघात, तिघेजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील अवघड वळणावर बस आणि इर्टिगा कार यांच्यात सकाळी अपघात झाला. या अपघातात एस. टी. बस मधील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहे. तर इर्टिगामधील ड्रायव्हर एअरबॅगमुळे बचावला. हा अपघात सकाळी 10 च्या सुमारास घडला.

मिळालेल्या वृत्तानुसार, देवरुखहून संगमेश्वरच्या दिशेने एस. टी. बस चालक विलास कदम प्रवाशांना घेवून निघाले होते. करंबेळे घाटी येथील अवघड वळणावर मुंबईहून देवरुखला जाणाऱ्या इर्टिगा कारची बसला जोरदार धडक बसली . या धडकेत कारचे दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. एस. टी. बस मधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये तिघे जखमी झाले त्यात एका वृध्द महिलेचा समावेश आहे. तर इर्टिगा कारमधील दोघेजण एअरबॅग असल्यामुळे सुदैवाने बचावले आहेत. नातेवाईकांच्या कार्यासाठी जात असताना करंबेळे घाटीत इर्टिगा चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात झाला असे सांगितले जात आहे. मात्र एस. टी चालकाने इर्टिगाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करुन गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही वेगाने आलेली कार बसच्या उजव्या बाजूला धडकली असे अपघातस्थळावरील दृष्य दिसत होते . पोलीस आणि एस टी अधिकाऱ्यांनी या अपघाताचा पंचनामा केला आहे .