
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2022 मधील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध जिंकून दौऱ्याची चांगली सुरुवात केली आहे. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला असला तरी, टीम इंडियाला आगामी सामने मोठ्या फरकाने जिंकण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे, कारण ऑस्ट्रेलियातील संततधार पावसाचा सामन्याच्या निकालावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया नेट रन रेट चांगला ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. हिंदुस्थानचा पुढील सामना नेदरलँडशी होणार आहे.
सुपर 12 मधील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा संघ भले पराभूत झाला, परंतु बांगलादेशसारख्या संघाला देखील त्यांनी सहजासहजी सामना जिंकू दिला नाही. नेदरलँडने अवघ्या 9 धावांनी हा सामना गमावला. मात्र, हिंदुस्थानी संघाचा फॉर्म पाहता नेदरलँडसाठी हा सामना जिंकणे आव्हानात्मक आहे.
नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स म्हणाला की, ‘आम्हाला आशा आहे की हिंदुस्थानचा महान फलंदाज विराट कोहली गुरुवारी टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात आमच्याविरुद्ध पाकिस्तानसारखी खेळी खेळणार नाही. एडवर्ड्स हा मूळचा मेलबर्न येथील रहिवासी आहे. नंतर तो नेदरलँडमध्ये स्थायिक झाला. तो म्हणाला की मला माझ्या संघाकडून फारशा अपेक्षा नाहीत. पण माझ्या सहकाऱ्यांनी शक्य तितके सर्वोत्तम क्रिकेट खेळावे अशी माझी इच्छा आहे.
एडवर्ड्सने बुधवारी सांगितले की, ‘विराटने त्या दिवशी खेळलेली खेळी अप्रतिम होती. आशा आहे की तो आमच्याविरुद्ध अशी खेळी खेळणार नाही. आमच्याकडून जिंकण्याची अपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे आमच्यावर फारसे दडपण नाही. आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.’
नेदरलँड्ससारख्या संघासाठी हिंदुस्थानविरुद्ध खेळण्याची संधी मिळणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. आमच्यासाठी हा मोठा सामना आहे, विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न आम्ही पाहिले होते आणि जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळणे हे आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. असे एडवर्ड्स म्हणाला.



























































