
>>चंद्रसेन टिळेकर
बहुसंख्य अशिक्षित असलेल्या आपल्या देशात भोळ्याभाबडय़ा जनांना दुःखात देवाचा आधार वाटणे स्वाभाविक आहे. काही मर्यादेपर्यंत देवावर श्रद्धा ठेवायलाही हरकत नाही, पण ‘अति तिथे माती’ या उक्तीप्रमाणे देवावर सर्वस्वी अवलंबून राहणे चुकीचे आहे हे त्यांच्या मनावर कसे बिंबवायचे? हा प्रश्न आहे.
गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून लोकांच्या कानीकपाळी ओरडून सांगत की, ‘‘देवळात देव राहत नाही, तर देवळात पुजाऱयाचे पोट ऱहायते!’’ पण आम्ही बहुतांश लोकांनी एका कानाने ऐकून दुसऱया कानाने सोडून देण्याचे व्रत घेतले होते हे कुठे गाडगेबाबांना माहीत होते? महाराष्ट्रात ठिकठिकाणी उभी राहिलेली जागृत देवस्थाने याची साक्ष आहेत. देहू परिसरातील असेच एक देवस्थान जागृत म्हणून पूर्वी समजले जायचे. असाच एकदा गावातून सर्व कामे आटपून मुंबईला निघालो होतो. दिवस होते मे महिन्याच्या कडक उन्हाळ्याचे. त्या देवीच्या देवळाजवळ जसजसा येऊ लागलो तसे एक विचित्रच दृश्य दिसू लागले. ऐन तिशीतल्या एका तरुणीला झाडाला बांधले होते आणि तीन-चार म्हाताऱया बायका तिला झाडूने, काठीने मारीत होत्या. मी जवळ जाऊन दरडावून त्या म्हाताऱया बायकांना विचारलं,
‘‘का मारता हो तिला?’’
तसं त्या म्हणाल्या,
‘‘तिला भूत लागलया. तिला मोकळी सोडली तर ती जीव द्यायला जाती.’’
‘‘काही जीव देणार नाही, तिला सोडा.’’
तेवढय़ात ती तरुणी काकुळतीला येऊन मला म्हणाली,
‘‘नाही हो दादा मी जीव देणार, पण मला काही करून सोडा, या बाया मला लई मारत्यात.’’
मी त्या बायकांना तिला सोडायला सांगितले. नेमका हा काय प्रकार आहे हे मला शोधून काढायचे होते. तेवढय़ात देवळाच्या बाजूला असलेल्या दवाखान्यातून डॉ. एळवंडे आले. त्यामुळे मला चांगलाच हुरूप आला. कारण ते पुरोगामी मताचेच होते. ते मला म्हणाले,
‘‘अहो, गेले कित्येक दिवस या मुलीला इथे मारहाण या बायका करताहेत. मी सांगून पाहिलं, पण तेवढय़ापुरते सोडतात. मी गेलो की, लगेच बांधून टाकतात. लक्ष तरी किती ठेवायचं?’’
शेवटी आम्ही त्या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. ‘‘मी तुमच्या भावासारखा आहे. माझ्यापासून काहीही लपवू नका. बिनधास्तपणे काय झालंय ते मला सांगा.’’
असा दिलासा दिल्यानंतर तिने कसेबसे अवसान गोळा करून सांगायला सुरुवात केली. ती बराच वेळ आपली कहाणी सांगत होती खरी, पण तिच्या सांगण्यात बरीचशी विसंगती, असंबद्धता होती. अधूनमधून ती सारखी सारखी ‘‘जगबुडी आलीय’’ असे म्हणत होती.
मला तिच्या बोलण्यातून जे समजले ते असे होते की, तिचे लग्न होऊन चांगली आठ वर्षे होऊन गेली होती, पण तिला मूल झाले नव्हते. तिचे सासर तळेगाव ढमढेरे. तिथल्या परिसरातील सगळे तांत्रिक, मांत्रिक, बुवा, महाराज करून झाले. उपासतपास झाले. आजूबाजूच्या देवदेवतांना नवस बोलून झाले, पण काडीचेही यश आले नाही. त्यावर तिच्या सासूने एक उपाय काढला तो म्हणजे या सुनेने तिच्या तीन जावांच्या एकूण आठ मुलांचे आणि विधवा नणंद जी माहेरी राहत होती तिच्या दोन मुलांचं असं एकूण दहा मुलांचं जेवण वगैरे तर बघायचंच, पण त्या सगळ्या मुलांची सगळी घाणही साफ करायची. असे केल्याने देव प्रसन्न होऊन तिला मूल देईल अशी सासूची प्रामाणिक भावना. त्या मुलीचा नाइलाज झाला. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत तिचा वेळ त्या दहा मुलांची घाण साफ करण्यातच जायला लागला. ती अगदी मेटाकुटीला आली. अशा परिस्थितीत ती जगणे शक्यच नव्हते. म्हणून ती जीव देण्यासाठी नदी, विहिरीकडे धाव घेऊ लागली. मग घरातल्याच कुणीतरी तिला भूत लागले असावे अशी शंका घेतली आणि सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. हे सगळे तिला मूल होत नसल्याने घडत असल्याने कुणीतरी तिच्या कुटुंबाला सांगितले की, देहू परिसरातील एका वस्तीत एक देवीचे जागृत देवस्थान आहे. त्या देवीची सेवा केल्यास नक्की तिला मूल होईल. यावर विश्वास ठेवून त्या कुटुंबाने तिला तिथे आणून टाकलं होतं.
सगळी कथा ऐकून घेतल्यावर मी मुलीला विचारलं, ‘‘पण देवळात का आला नाहीत?’’
थोडा वेळ ती गप्पच राहिली आणि नंतर खाली मान घालून म्हणाली, ‘‘दादा, मला माझा स्त्र्ााr धर्म चुकलाय का? अशा अवस्थेत मी देवळात यायचं पाप कसं करू? म्हणून तर मी लांब पळून जायचा प्रयत्न करीत होते.’’
देवळाच्या समोरच्या पारावर त्या मुलीचे वडील खाली मान घालून बसले होते. डॉ. एळवंडेनी त्यांना हाक मारली आणि ते समोर आल्यावर त्यांनी विचारले,
‘‘तुमच्या मुलीचे लग्न होऊन आठ वर्षे होऊन गेली तरी तिला मूल झाले नाही म्हणून या नवराबायकोची मेडिकल टेस्ट केली का?’’
‘‘हो, दोघा नवराबायकोची टेस्ट केली. डॉक्टर म्हणाले हिच्यात काही दोष नाही. त्यांनी जावयात दोष सांगितला.’’
‘‘अहो, मग मुलीला कशासाठी मारहाण?’’
‘‘काय करणार, लोक म्हणाले हे जागृत देवस्थान आहे. देवी कुणाला निराश करीत नाही. मुलीला तिच्या सेवेसाठी इथे ठेवा, देवी नक्की फळ देईल.’’
प्रसंग मोठा बाका होता, किंबहुना संवेदनशील होता. देवावरच्या श्रद्धेला धक्का लावताना हजार वेळा विचार करावा लागतो. कितीही संताप आला तरी आवर घालावा लागतो. इथे तर एक मुलीच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न होता. ठोस भूमिका घेणे भागच होते. माझ्या विनंतीने तिचे वडील उपचारासाठी तयार झाले. पण फार काही साध्य झाले नाही. मुलीला तिच्या घरचे घेऊन गेले.
एक-दोन ओळखीची मंडळी पुढे आली आणि त्यांनी मला समजावणीच्या स्वरात सांगायला सुरुवात केली,
‘‘अहो, आमच्यापैकीच काही लोकांनी मुलीच्या वडिलांना बजावलं, एकदा देवीच्या दारात आणून टाकलेल्या माणसाला तिथून उचलून डॉक्टरकडे उपचारासाठी नेणे म्हणजे देवीवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. असे केल्याने सर्व गावावर देवीचा कोप होतो. पूर्वी जेव्हा जेव्हा असे झाले तेव्हा गावावर रोगाची साथ आली होती. त्या लोकांना ते पटले आणि ते मुलीला घेऊन तळेगावला निघून गेले.’’
डॉ. आगाशेंनी पाठवलेली गाडी रिकामीच परत गेली. मी आणि डॉ. एळवंडे खिन्न होऊन त्यांच्या दवाखान्यात गेलो. शेवटी डॉक्टरच म्हणाले, ‘‘झाल्या प्रकाराबद्दल काय वाटते?’’
‘‘डॉक्टरसाहेब, बहुसंख्य अशिक्षित असलेल्या आपल्या देशात भोळ्याभाबडय़ा जनांना दुःखात देवाचा आधार वाटणे स्वाभाविक आहे. काही मर्यादेपर्यंत देवावर श्रद्धा ठेवायलाही हरकत नाही, पण ‘अति तिथे माती’ या उक्तीप्रमाणे देवावर सर्वस्वी अवलंबून राहणे चुकीचे आहे हे त्यांच्या मनावर कसे बिंबवायचे? हा प्रश्न आहे. आपल्या समाजाला पुन्हा गाडगेबाबांची फार मोठी गरज आहे.’’
तेवढय़ात चहा आला. आवडणारा चहाचा पहिला घोटच मला अत्यंत कडवट लागला!
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडीत आहेत)































































