
बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करणारे आमदार रवी राणा यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर येत जाहीर दिलगिरी व्यक्त करत त्यांचं वक्तव्य मागे घेतले. तसेच राणा यांनी त्यांच्यासाठी हा विषय संपल्याचेही जाहीर केले. मात्र आमदार बच्चू कडू यांनी मात्र याबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच निर्णय घेणार आहे, असे प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केलं आहे.
”आज संध्याकाळी सगळ्या कार्यकर्त्यांची आमची बैठक असून त्यानंतर पुढे काय करायचं ते ठरवू. उद्या आमचा जाहीर मेळावा आहे. त्यावेळी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली त्यासाठी त्यांचे आभार पण यात कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची कारण माझा आत्माच कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे आज बैठक झाल्यावरच निर्णय स्पष्ट करू. वाद व्हायला नको होता. जे काही आरोप केले ते राणांनी केले होते. आरोप झाल्यानंतर मी चूप राहिलो असतो तर लोकांनी मला बदनाम केलं असतं. मी चुकीचं वागलो असं वाटलं असतं.’, असे बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
































































