
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आणि वकार युनूसपाठोपाठ शाहिद आफ्रिदीही धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवचा फॅन झाला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने केलेल्या अद्वितीय खेळीमुळे जगभरातील साऱ्याच क्रिकेटपटूंनी त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला होता. आता त्या यादीत आफ्रिदी या विस्पह्टक फलंदाजाचे नाव जोडले गेले आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने केलेल्या अद्भुत खेळीचे केवळ कोटय़वधी प्रेक्षकच नव्हे तर आजी-माजी क्रिकेटपटूही दिवाने झाले आहेत. पाकिस्तानात एका चॅनेलवर झालेल्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीने सूर्यकुमारच्या फटक्यांची तारीफ करताना जराही पंजुषी केली नाही. तो म्हणाला, सूर्या फक्त चांगल्या चेंडूवरच फटके मारतो. तो 200-250 स्थानिक पातळीवरील सामने खेळल्यानंतर हिंदुस्थानी संघात आला आहे. त्याला आपला खेळ चांगलाच माहीत झालाय. त्याने किती कसून सराव केलाय हे त्याच्या फलंदाजीवरून दिसूनच येते.



























































