
नवरा-बायकोच्या भांडणाबाबत अनेक बातम्या वाचल्या आणि ऐकल्या जातात, मात्र राजस्थानाच्या बाडमेर येथे पतीपासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी पत्नीने जे भयंकर कृत्य केले ते वाचून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
बाडमेर जिल्ह्यातील धोरीमन्ना भालीसर गावात राहणाऱ्या गोराराम (21) या तरुणाचा विवाह 6 महिन्यांपूर्वी कानू देवी (19) वर्षीय तरुणीसोबत झाला होता. ती सनवडा बारमेर येथील रहिवासी आहे, तर गोराराम हा शेतकरी आहे. गावच्या पारंपरिक आटा-साटा या प्रथेनुसार या दोघांचा विवाह लावून देण्यात आला होता, मात्र कानूदेवीला दुसरे लग्न करायचे होते. 1 ऑक्टोबरला रात्री कानू देवी आणि गोराराम रात्रीच्या वेळी शेतात गेले होते. तेव्हा शेतात बनवलेल्या शेडमध्ये गोराराम झोपला होता. त्यावेळी पत्नीने त्याच्या गुप्तांगावर ब्लेडने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोरारामला जाग आली आणि तो वेदनेने जोरजोरात ओरडू लागला. पतीचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न केल्यामुळे पीडित पती गोरारामने मंगळवारी पोलिसांत तक्रार केली.
या घटनेबाबत पीडित गोरारामने पोलिसांना सांगितले की, रात्री पत्नीसोबत शेतात गेलो असताना ती बराच वेळ फोनवर कोणाशी तरी बोलत होती. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. थोड्यावेळाने गोरारामला झोप लागल्यावर रात्री झोपेत असताना अचाकन तिने त्याच्या गुप्तांगावर ब्लेडने वार केले. अनपेक्षित हल्ल्यामुळे गोराराम ओरडू लागला. यामुळे कुटुंबातील इतर सदस्यही जागे झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला खासगी रुग्णालयात नेऊन उपचार केले, मात्र जखम फार खोलवर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हल्ल्यानंतर नातेवाईकांनी आरोपी कानूदेवीला तू असे का केलेस ? असे विचारले असता तिने सांगितले की, मेहुण्याने पतीचे गुप्तांग कापल्यास तो नपुंसक होईल, असे सांगितले होते. त्यानंतर तुला त्याच्यापासून घटस्फोटही घेता येईल. यामुळे तू तुला पसंत असलेल्या मुलाशी लग्न करू शकशील. या घटनेनंतर पत्नीने महिला पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या कुटुंबियांविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा गुन्हाही दाखल केला.
सध्या पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पती-पत्नीमध्ये सुरू असलेला वाद महिनाभर पंचायतीसमोर येत होता. सामाजिक स्तरावर दोन्ही पक्षांची संमती पंचायतीकडून घेण्यात येत होती, मात्र तरीही त्या दोघांमध्ये वादविवाद सुरूच होते. वैद्यकीय अहवालानुसार, सध्या पीडित तरुणाची जखम बरी झाली आहे. पोलीस आरोपी पत्नीची चौकशी करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी धोरिमान्ना येथील रुग्णालयातील डॉ. बुधाराम विश्नोई यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पीडित तरुणाने धारदार वस्तूने प्रहार केल्याचे सांगितले. गुप्तांगाला फारशी जखम नव्हती. उपचारानंतर काही तासांतच त्यांना घरी पाठवण्यात आले.
























































