महाराष्ट्राचं खच्चीकरण हेच खोके सरकारचं ध्येय! आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्ये करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधाऱयांविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने केली जात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही शिवरायांचा अवमान करणाऱया मिंधे सरकारचा ‘इमान विकलेले गद्दार’ असा उल्लेख करून जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्राचे खच्चीकरण’ हेच खोके सरकारचे ध्येय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱयांचा राजकीय, सामाजिक स्तरावरून तीव्र निषेध होत आहे. सोशल मीडियावरही नेटीझन्सकडून अशा व्यक्ती आणि प्रवृत्तींचा धिक्कार केला जात आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत टीका केली आहे. ‘इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे.’ असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.