
मुंबईसह राज्यभरातील तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित शिव आरोग्य सेना गोरगरीब-सर्वसामान्यांसाठी ‘देवदूत’च ठरत आहे. शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून गोरगरीब-गरजूंना वैद्यकीय मदतीसह आर्थिक मदतही करण्यात येत आहे. यासाठी शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून शेकडो डॉक्टर, आरोग्य सेविकाही गरजवंतांसाठी काम करीत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली ही आरोग्य सेवा सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून राज्यभरात आरोग्य सेनेचे काम सुरू आहे. आगामी काळात शिव आरोग्य सेनेच्या कार्याची व्याप्ती आणखी वाढवण्यात येणार आहे. यासाठी नव्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्याही केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ. शुभा राऊळ आणि कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांची मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांनी शिव आरोग्य सेनेला मार्गदर्शन करण्याचे आश्वासन यावेळी दिले. यासाठी अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिव आरोग्य सेनेकडून करण्यात आले आहे. यावेळी कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. उद्धव इंगोले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. महेश क्षिरसागर, महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सोहेल अख्तर, डॉ. रामलिंग शेटे, अमोल वंजारे, सिद्धेश मोहिरे, दीपक सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.



























































