
>> मेघा गवंडे-किटे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषा, स्थानिक भाषा हा एक प्रमुख भाषा विषय म्हणून शालेय अभ्यासक्रमात शिकविण्याची शिफारस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची मातृभाषा आणि शिक्षणाचे माध्यम यात तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही नव्या शिक्षण धोरणात सुचविले आहे. देशात या धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर अभ्यासक्रमात त्रिभाषा सूत्र राबविण्यात येणार असून सर्व राज्यांवर तसेच विद्यार्थ्यांसमोर भाषा निवडीचा पर्याय खुला असणार आहे.
नव्या शिक्षण धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. कमीत कमी पाचवीपर्यंत आणि अपेक्षित इयत्ता आठवी व त्यापुढेही सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये मातृभाषा आणि स्थानिक भाषा शिकविण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावयाचे असून विद्यार्थ्यांची मातृभाषा आणि शिक्षणाचे माध्यम वेगळे असेल तर अशा शाळांमधील शिक्षकांनी द्विभाषिक पद्धतीसह द्विभाषिक शैक्षणिक साधनांचा वापर करावा. मातृभाषेतील पाठय़पुस्तके उपलब्ध नसल्यास शिक्षक-विद्यार्थ्यांमधील संवादाचे माध्यम विद्यार्थ्यांची घरची भाषा असेल, अशी शिफारसही या धोरणात करण्यात आली आहे.
शास्त्रीय भाषा आणि साहित्य, दोन वर्षांचा अभ्यासक्रम
सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शास्त्राrय भाषा आणि साहित्य हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. यात विद्यार्थी शास्त्राrय भाषा आणि त्यांचे साहित्य यांचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकात्मिक, अनुभवात्मक, नावीन्यपूर्ण उपागम असा अभ्यास करू शकतील. बारावीनंतर पुढेही या अभ्यासक्रमाचे नवे पैलू उपलब्ध असतील. संस्कृतशिवाय तामीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया, पाली, पारशी या भाषेतील व्यापक साहित्याचा समावेशही अभ्यासक्रमात असेल.
सहावी, सातवीनंतर भाषा विषय बदलण्याचा पर्याय
त्रिभाषा सूत्रातील तीनपैकी एक किंवा अधिक भाषा बदलण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर असेल. सहावी-सातवीत विद्यार्थी भाषा विषयात बदल करू शकतात, मात्र असे करताना विद्यार्थ्याला तीनही भाषेत माध्यमिक स्तराच्या शेवटी त्या भाषेतील मूलभूत प्रावीण्य मिळविणे आवश्यक आहे. त्रिभाषा सूत्रात दोन हिंदुस्थानी भाषांसह विद्यार्थ्यांसमोर इंग्रजीसह कोरियन, जपानी, थाई, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगाल आणि रशियन या विदेशी भाषा माध्यमिक स्तरावर अभ्यासण्याचा पर्याय आहे.
सुरुवातीच्या वर्षामध्ये वाचणे आणि नंतर मातृभाषेतून लेखन. तिसरीच्या पुढे अन्य भाषेतील साहित्य वाचन आणि लिखाण.
देशातील सर्व भाषांच्या विकासासाठी भाषा शिक्षकांमध्ये मोठी गुंतवणूक.
विज्ञान, गणिताची द्विभाषिक पाठय़पुस्तके उपलब्ध होणार.
शालेय तसेच उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषा नव्या पर्यायी रूपात येणार.
देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला हिंदुस्थानी भाषा या विषयावर आधारित रंजक उपक्रमात सहभागी होता येणार आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमात भाग घेता येईल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषा शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एसएससी बोर्डात यापूर्वीच त्रिभाषा सूत्र लागू आहे. सीबीएसई, आयसीएसईमध्ये दोन भाषा विषय अभ्यासले जातात. धोरणातील या शिफारसीची राज्य सरकार किती काटेकोरपणे अंमलबजावणी करते हे पाहावे लागेल.
– महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळ



























































