हा तर लोकशाहीच्या तत्वाला काळिमा फासणारा प्रकार, अनिल देसाई यांची मिंधे गटावर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक चिन्हाच्या संदर्भात आज निवडणूक आयोगात तब्बल दोन तास सुनावणी झाली. सव्वा चारच्या सुमारास सुनावणी सुरु होताच या सुनावणी दरम्यान शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि कामत यांनी मुद्दे मांडले. सुनावणी संपल्यानंतर शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘विधानसभेत आणि लोकसभेत निवडून आलेले सदस्य जास्त असल्याने आम्हाला चिन्ह देण्यात यावे’ असा दावा यावेळी मिंधे गटाकडून करण्यात आला. चिन्हाचा निर्णय तातडीने व्हावा असा त्यांचा आग्रह होता. खरंतर हा लोकशाहीच्या तत्वाला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. मात्र आम्हाला न्याय देवता आणि निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाचा निर्णय नको. असे मत अनिल देसाई यांनी व्यक्त केले.

त्यांच्या मूळ पक्षाने त्यांना तिकीट दिल्यानेच ते आमदार आणि खासदार झाले आहेत. म्हणूनच मूळ पक्ष हा महत्वाचा आहे. शिवसेना पक्षावरील आपला दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 20 लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज निवडणूक आयोगासमोर सादर केले आहेत. त्याशिवाय सुमारे तीन लाख पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. जिल्हा प्रमुखांपासून ते शाखाप्रमुख, गटप्रमुखांचा यात समावेश आहे. मात्र हे एवढं सगळं डावलून केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येवर निर्णय द्यावा अशी मागणी करणे म्हणजे देशातील लोकशाही धोक्यात येत आहे का? असे वाटत आहे. असे यावेळी अनिल देसाई म्हणाले.