
दिव्य दरबारात चमत्कारांचे दावे करून नंतर पळ काढणाऱया धीरेंद्र शास्त्राr महाराज ऊर्फ बागेश्वर बाबाने जगद्गुरू तुकाराम महाराजांविषयी संदर्भहीन दाखला देत आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केलेय. तुकाराम महाराजांना त्यांची बायको काठीने बडवायची, अशी गरळ त्यांनी ओकली. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा घोर अपमान करणाऱया बागेश्वर बाबाच्या विरोधात महाराष्ट्रात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मिंधे सरकारने मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा वारकरी संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील जनतेकडून सर्वत्र निषेध केला जात आहे. तुकाराम महाराजांविषयी केलेले वक्तव्य मागे घेऊन माफी मागा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.
संतांवर चुकीची वक्तव्ये नकोत – देहू संस्थान
तुकाराम महाराजांविषयी अगोदर सविस्तर माहिती घ्यावी मगच बोलावे. वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे. बंबाजी, रामेश्वर भट्ट यांना माफ करणारा आहे. बागेश्वर महाराज आम्ही तुम्हाला माफ करतो. क्षमा करणे हा वारकऱयांचा सर्वात मोठा गुण आहे. संतांवर चुकीची वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्रातील तमाम वारकऱयांना आवाहन करतो की, यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. संतांवर कोणी काही बोलू नये म्हणून यावर कायदा बनवावा. जेणेकरून अशा गोष्टींना पायबंद बसेल, अशी प्रतिक्रिया देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळेंकडून निषेध
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध केला आहे. ‘जे लोक असे बोलतात ते अर्थातच चुकीचे आहे. मी अध्यात्माकडे वळलेले आहे. मी अध्यात्म करते म्हणजे माझ्या घरात वाईट आहे असे नाही. हे हिंदुस्थानी संस्कार आहेत. हे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराजांचा अपमान केला जात असेल तर एक समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
व्हायरल व्हिडीओत काय?
संत तुकाराम महाराष्ट्रातील एक संत होते. त्यांची पत्नी त्यांना दररोज काठीने मारहाण करत होती. एका व्यक्तीने त्यांना याविषयी विचारणा केली. तुम्ही दररोज बायकोचा मार खाता, तुम्हाला त्याची लाज वाटत नाही का?, असे तो म्हणाला. त्यावर तुकाराम त्या गृहस्थाला म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.
त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा! प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो, भक्तीत लीन झालोच नसतो. पत्नीच्याच प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्यानेच मला देवाची सेवा करण्याची संधी मिळाली असे बागेश्वर बाबा सांगत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.
तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!
बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्य प्रदेशात खपेल, पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱया संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेले महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावे. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा! असे ट्विट राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
























































