‘एफपीओ’ मागे घेतल्याने देशाच्या प्रतिमेवर परिणाम नाही, अदानी प्रकरणी ‘सेबी’कडून चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gautam-adani

अमेरिकेच्या ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अहवालानंतर अदानी उद्योगसमूहाला जबरदस्त हादरा बसला असून, शेअर्सची घसरण सुरूच आहे. 10 दिवसांत शेअर्सच्या पडझडीमुळे 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. या प्रकरणाची ‘सिक्युरिटीज् ऍण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात ‘सेबी’कडून स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

‘अदानी एंटरप्रायजेस’ने दोन दिवसांपूर्वी ‘एफपीओ’ रद्द केला आणि 20 हजार कोटी परत करण्याचे जाहीर केले होते. यावर आज पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, ‘‘एफपीओ येतात आणि जातात. देशात अनेक वेळा एफपीओ मागे घेतले गेले. चढ-उतार बाजारात होत असतात. त्यामुळे देशाच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. अदानी समूहाबाबत एसबीआय, एलआयसी आणि रिझर्व्ह बँकेने यापूर्वी आपली भूमिका मांडली आहे,’’ अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

– या प्रकरणावर ‘सेबी’ने मौन सोडले असून, शेअर बाजार सुरळीत, पारदर्शक आणि कार्यक्षमतेने चालेल यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे म्हटले आहे. ‘सेबी’ने अदानी समूहाचे थेट नाव घेतले नाही. मात्र, विशिष्ट प्रकरणे निदर्शनास आल्यानंतर ‘सेबी’ तपासणी करून कारवाई करते, असे म्हटले आहे.