
सध्या जगभरातून आर्थिक मंदीच्या बातम्या येत आहेत. जगभरातील आघाडीच्या टेक कंपन्यांनी सुरू केलेली कर्मचारी कपात अद्यापही थांबलेली नाही. यात आता आणखी एका जगप्रसिद्ध कंपनीचा समावेश झाला आहे. ही कंपनी म्हणजे गुगल. गुगल इंडियाने गुरुवारी रात्री उशिरा हिंदुस्थानातील विविध विभागांतील तब्बल 453 कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्टातून पत्र पाठवून कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली आहे.
12,000 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील
बिझनेस लाइनने दिलेल्या वृत्तानुसार, गुगल इंडियाचे हिंदुस्थानातील प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी मेलद्वारे कर्मचारी कपात केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. गेल्याच महिन्यात गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटनं जगभरात मिळून 6 टक्के कर्मचारी काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, एकूण 12 हजार कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. हिंदुस्थानातील 453 कर्मचाऱ्यांची कपात ही त्याच योजनेचा भाग आहे की हा स्वतंत्रपणे घेण्यात आलेला निर्णय आहे, याबाबत अद्याप स्पष्ट समजू शकलेले नाही.
गुगलमध्ये झालेल्या कर्मचारी कपातीची चर्चा असतानाच आता सीईओ सुंदर पिचाई यांच्यावरही याचे परिणाम होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्याची खराब झालेली आर्थिक परिस्थिती पाहता त्यांच्या पगारातही मोठी कपात अपेक्षित आहे. हल्लीच झालेल्या एका टाऊन हॉलच्या बैठकी दरम्यान त्यांनी कंपनीतील वरिष्ठ उपाध्यक्ष पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बोनसवरही याचा परिणाम होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.




























































