लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल; कारवाईचा संशय आल्याने व्हाइस रेकॉर्डर हिसकावून काढला पळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी दाखल गुह्यात व्यापाऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल न करण्यासाठी व त्याला अटक न करण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारावर नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पडताळणीवेळी तक्रारदाराकडील व्हाइस रेकॉर्डर घेऊन या हवालदाराने पळ काढल्याने पुरावा नष्ट केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. एकनाथ पंडित निपसे (वय 42, पोलीस हवालदार, नेमणूक कोतवाली पोलीस स्टेशन, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराचे नगर तालुक्यातील देहरे येथे किराणा दुकान आहे. ते किराणा सामान व धान्य विक्री करतात. गावातील काही लोक मुलांना शाळेत मिळालेला तांदूळ त्यांच्या दुकानात आणून विकतात. हा तांदूळ ते नगरच्या मार्केट यार्डमधील एका व्यापाऱ्याला विकतात. तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांच्या दुकानावर कोतवाली पोलिसांनी धाड टाकून काळ्या बाजारातील तांदूळ जप्त करून त्यांना अटक केली होती.

अटकेदरम्यान त्या व्यापाऱ्याने तक्रारदाराकडून तांदूळ विकत घेतल्याचे सांगितले. त्यामुळे कोतवालीतील पोलीस हवालदार एकनाथ निपसे याने तक्रारदार व त्यांच्या मुलाला गुरुवारी (दि. 16) बोलावून घेतले. त्यांच्या मुलाला या गुह्यात आरोपी न करण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, निपसे याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती.

पडताळणीवेळी आरोपीला तक्रारदार व पंचांबाबत संशय आल्याने, निपसे याने तक्रारदाराला एका खोलीत नेऊन दरवाजा बंद करून त्यांची झडती घेतली. त्यावेळी तक्रारदाराच्या कपडय़ांमध्ये लपविण्यात आलेले डिजिटल व्हाइस रेकॉर्डर मिळून आले. ते व्हाइस रेकॉर्डर काढून घेत निपसे याने पोलीस स्टेशनमधून पळ काढला आहे. त्यानंतर निपसे याच्याविरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये लाचेची मागणी करणे, व्हाइस रेकॉर्डर हिसकावून घेऊन जाऊन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.