>>शिरीष कणेकर
राहुल द्रविडसारखा चांगला माणूस व उत्तम क्रिकेटपटू प्रशिक्षक (पक्षीः ‘कोच’) झाला तेव्हापासून या पदाविषयी माझं मत सौम्य होत गेलं. म्हणजे पूर्वी गुलशन ग्रोव्हरविषयी होतं ते आता जानकीदास इतपत झालंय, पण पूर्वी प्रशिक्षक या संस्थेविषयी माझ्या मनात इतका राग का होता, हे सांगणं तर बनता है बॉस,
आमचा एक ‘कोच’ होता. (आपण त्यांना नानासाहेब म्हणू या.) ज्या लायकीचे आम्ही क्रिकेटपटू होतो त्याच लायकीचा आमचा ‘कोच’ होता. सचिनचे जसे आचरेकर तसे माझे नानासाहेब. त्यामुळेच सचिन सचिन झाला आणि मी मी झालो. तसा मी रोज रात्री माझ्या बॅटीला नियमितपणे तेल लावत असे. (काwसल्याही एवढय़ा मायेनं व प्रेमानं रामाच्या डोईवर तेल थापटत नसेल.) पण टेनिस बॉलनं खेळण्यासाठी बॅटीवर तेल? (तेल लावत गेला तो कोच!) नानासाहेब प्रथम आमच्या बॅटी तपासत. त्याच्यातून तेल निथळायला हवं. नानासाहेब बॅटीवरचं तेल बोटानं काढून हळूचकन स्वतःच्या डोक्याला लावतात, असं रिक्षावाल्याचा मुलगा मोहन याने मला सांगितले. मोहन आमच्या संघातला बेन स्ट्रोक्स होता. मी आमच्या संघाचा ‘वन डाऊन’ ब्रॅडमन होतो. (तेव्हा पुजारा नव्हता आणि असता तरी स्वतःला पुजारा कोण म्हणवून घेईल? स्वतः पुजाराही स्वतःचं नाव बदलून घ्यायचा विचार करतोय म्हणे. नवीन नाव अगदीच रहाणे नको.)
आमच्यातल्या कोणी (व का?) नानासाहेबांना गाठले देव जाणे. ग्रहमान वाईट असलं की अशा गोष्टी होत असाव्यात, पण आमचं सगळय़ांचंच ग्रहमान एकाच वेळी वाईट होतं? अन् ‘कोच’च्या ग्रहांनीही माती खाल्ली होती?
क्षेत्ररक्षणाचं कठोर ट्रेनिंग ते त्यांच्या दिवाणखान्यात द्यायचे. म्हणजे ते गुबगुबीत कोचावर बसायचे. (‘कोच’साठी असतो तो कोच!) तिथून ते कुठंही वेडेवाकडे बॉल फेकायचे. आम्ही फरशीवर सूर मारून ते झेल नसलेले झेल पकडायचे. वाट लागायची. जाँटी ऱहोडस्देखील पळून जाऊन संदीप पाटीलच्या घरी लपून बसला असता. तिथेच पलंगाखाली दुराणी, मांजरेकर व सुभाष गुप्ते भेटले असते. त्यांनाही क्षेत्ररक्षणाची ‘अॅलर्जी’ होती. गुप्तेला ‘नॉर्थ स्टँड’च्या दिशेनं पोट व जीव संभाळत लुटूलटू, दुडूदुडू धावताना मी पाहिलंय. त्याच्या हातात चेंडू दिला की मग मात्र तो जादुगार व्हायचा. नानासाहेबांना बसायला सोफा मिळाला की ते छळवणूक पेंद्राचे प्रमुख क्रूरकर्मा होत. ‘फरशीवर झेल पकडताना त्यांचे अपघाती निधन झाले’ असे माझ्याबद्दल छापून आले असते.
नानासाहेबांच्या बंगल्यामागच्या अंगणात आमचं फलंदाजीचं व गोलंदाजीचं प्रशिक्षण चाले. (ज्यांनी ते पाहिले ते थेट स्वर्गी गेले) आमच्या गोलंदाजीवर नानासाहेब चार प्रकारची फलंदाजी करून दाखवीत-(1) शिस्तबद्ध फटकेबाजी (2) वेडीवाकडी फटकेबाजी (3) शिस्तबद्ध बचाव (4) वेडावाकडा बचाव यातल्या कुठल्या प्रकारात त्यांना बाद केलं यावर आमचे मार्क ठरत. म्हणजे शिस्तबद्ध बचाव करताना त्यांची विकेट काढली तर सर्वाधिक मार्क, जणू विजय मर्चंटलाच बाद केलं होतं. एकदा मी नानासाहेबांच्या गोलंदाजीवर शिस्तबद्ध बचाव करीत बराच वेळ खेळत होतो. शेवटी त्यांनी हाफ पिचच्या मागे चेंडू पिच करायला सुरुवात केली. तो उडून विकेटकीपरच्याही डोक्यावरून जात होता. मी आरामात सोडून देत होतो. (के. एल. राहुल चेंडू सोडायला कुठे शिकला आता कळलं ना?) नानासाहेब भडकले व गरजले, ‘सोडतोस काय? खेळ.’
‘इतक्या पुढे येऊन? मी स्टंप आऊट होईन.’ मी उत्तरलो.
‘भित्रट. फुटवर्क कशाला असतं?’
‘शिस्तबद्ध बचाव करताना?’ मी प्रतिप्रश्न केला.
नानासाहेब इंजिनासारखा आवाज करीत वाफ सोडत होते.
एकदा त्यांच्या ऑफिसतर्फे ते मद्रासला सामना खेळायला (टेनिस बॉलनं?) गेले. प्रतिपक्षाकडे कृपालसिंग हा कसोटीवीर होता, पण नानासाहेबांपुढे काय? ते परतल्यावर आम्ही त्यांना सामन्याचा वृत्तांत विचारला.
‘अरे, सांगतोय काय मी तुला मगाचपासून वणेवर?’ माझं कणेकर हे आडनाव त्यांना पसंत नसावं. मलाही नव्हतं, पण वणेवरमध्ये तरी काय दम होता सांगा. अन् मगाचपासून त्यांनी कुठं काय सांगितलं होतं?
तुला माहित्येय ना, माझा इनकटर कसा झपकन आत येतो ते. दॅट कृपालनसिंग वॉज प्लंब एल. बी. डब्ल्यू. बिपह्र ही ओपनंड हिज अकाडंट.’ मग त्यानं दोनशे केले तर त्याला काय अर्थ आहे?’
चला, नानासाहेबांची गोलंदाजी संपली होती. आम्ही आशेनं त्यांच्या फलंदाजीकडे वळलो.
‘दॅट कृपालसिंग बोल्स सिमिलर बॉल टू मी अँड दॅट ब्लडी फ्रॉड अंपायर गिव्हज मी आऊट एल. बी. डब्ल्यू?’
‘सर-सर, रन्सा किती केल्यात तुम्ही?’ मी विचारलं.
‘वणेवर, तुला क्रिकेट कळतं का काही?’ अरे, मी एल. बी. डब्ल्यू. झालो तर मी रन्स कशा करणार?’
एल. बी. डब्ल्यू. होण्यापूर्वी माणूस रन्स नाही करू शकत? पण त्यांचं काय झालं होतं की ते आधी एल. बी. डब्ल्यू. झाले होते, मग ते रन्सा कशा करणार?
एकदा त्यांची पुण्यातच मॅच होती. अर्थातच जाणार होतो.
आदल्या दिवशी ते आम्हाला म्हणाले, ‘अजून मैदान ठरायचंय.’
दुसऱया दिवशी दहाला सुरू होणाऱया मॅचचं मैदान आदल्या दिवशी संध्याकाळी सातपर्यंत ठरलं नव्हतं?
आम्ही नानासाहेबांना सोडलं, तेही सुटले.



























































