IND vs AUS फिरकीची धास्ती अन् उन्हाचा ताप! हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरी कसोटी आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान बुधवार, 1 मार्चपासून इंदूरच्या होळकर मैदानावर तिसरा कसोटी क्रिकेट सामना सुरू होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत यजमान हिंदुस्थानने पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये पाहुण्या इंग्लंडला अडीच दिवसांतच पराभूत केले होते. तिसरी कसोटी जिंकताच टीम इंडिया चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर करंडकावर आपले नाव कोरणार आहे. याचबरोबर कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे फायनलचे तिकीटही बुक करणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानसाठी या कसोटीतील विजय अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुसरीकडे इंदूरच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना पुन्हा फिरकीची धास्ती असणार आहे, तर दुपारच्या कडक उन्हाचा मनःस्तापही पाहुण्यांना सहन करावा लागणार आहे.

स्मिथकडे ऑस्ट्रेलियाची धुरा

कर्णधार पॅट कमिन्स आईच्या आजारपणामुळे मायदेशी परतल्याने अनुभवी स्टीव्ह स्मिथकडे ऑस्ट्रेलियन संघाची धुरा आली आहे, मात्र अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर जायबंदी झाल्याने उर्वरित मालिकेस मुकणार असल्याने ऑस्ट्रेलियाला याचा फटका बसणार आहे. वॉर्नर फॉर्ममध्ये नसला तरी त्याचा दिवस असल्यास कुठल्याही खेळपट्टीवर तो गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो. वॉर्नरच्या जागेवर मॅट रेनशॉ खेळणार असला तरी फिरकी गोलंदाजी खेळणे त्याला आतापर्यंत झेपलेले नाही. त्यामुळे या खडतर दौऱ्यावर अनेक स्टार खेळाडू संघात नसल्याचा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. कमिन्सच्या जागेवर मिचेल स्टार्क खेळण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानातील स्टार्कचे रेकॉर्ड चांगले नसले तरी तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.

हिंदुस्थानी फिरकीचा बोलबाला

रवींद्र जाडेजा व रविचंद्रन अश्विन ही क्रिकेटविश्वातील दर्जेदार फिरकीची जोडगोळी हिंदुस्थानच्या दिमतीला आहे. अक्षर पटेलसारखा तिसरा फिरकीपटूही त्यांच्या साथीला आहे. हे तिघेही फिरकीपटू अष्टपैलू खेळाडू असल्याने हा मोठा फरक उभय संघांमध्ये आहे. इंदूरच्या मैदानावर आतापर्यंत झालेले दोन्ही कसोटी सामने हिंदुस्थाननेच जिंकलेले आहेत. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच या मैदानावर कसोटी सामना खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा फॉर्मात असणे ही हिंदुस्थानची जमेची बाजू होय. खोलवर फलंदाजी असल्यामुळे आघाडीची फळी कोसळली तरी तळाच्या फलंदाजांमध्ये डाव सावरण्याची क्षमता असल्याने बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा यजमानांपुढे पुन्हा एकदा कस लागणार आहे, एवढे नक्की.