
कर्नाटकात एक लाजीरवाणी घटना घडली आहे. जेवरगी तालुक्यातील केल्लूर गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या सावळ्या रंगामुळे गळा दाबून हत्या केली आहे. याप्रकरणी महिलेच्या कुटुंबियांना तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पुढील कारवाई सुरू आहे.
द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, फरजाना बेगम असे या महिलेचे नाव आहे. फरजानाचा विवाह खाजा पटेल या तरुणासोबत सात वर्षांपूर्वी झाला होता. फरजानाचा चुलत भाऊ खुर्शीद याने सांगितले की, लग्न झाल्यापासून पटेल हा फरजानाचा रंगावरुन तिला सतत घालूनपाडून बोलायचा. कितीही पावडर चेहऱ्यावर लावली तरी कधीच गोरी होणार नाही असंही बोलायचा. पतीच्या छळामुळे त्रासलेल्या फरजानाने तिच्या घरच्यांनाही याबाबत सांगितले होते. खुर्शीद यांनी आरोप केला आहे की, फरजानाच्या नवऱ्यासह त्याचे कुटुंब फरजानाचा छळ करत होते आणि आणखी हुंड्याची मागणी करत होते. केल्लूर येथील एका दूधवाल्याने फोन करून फरजानाच्या मृत्यूची माहिती दिली तेव्हा या घटनेची माहिती मिळाल्याचे खुर्शीद यांनी सांगितले. फरझानाच्या आई-वडिलांसोबत तो केल्लूरला पोहोचला तेव्हा दोन्ही मुले मृतदेहाशेजारी बिलगुन बसलेली होती.
या प्रकरणाबाबत फरजानाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली. पटेल व त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच अटकेच्या भीतीने त्यांनी पोबारा केला. कलबुर्गी येथील रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर शहापूर येथे फरजानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खुर्शीद म्हणाले की, फरजानाचे आई-वडील तिच्या दोन्ही मुलांना घेऊन शहापूरला आले आहेत. कलबुर्गी ग्रामीणचे डेप्युटी एसपी उमेश चिकमठ यांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींच्या अटकेसाठी पुढील कारवाई सुरू आहे.

























































